मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम आज अजितदादांनी केले. हे गरजेचे होते व ते फक्त अजित दादाच करू शकतात, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोसोबतच इतर काही महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन झालं. यावेळी पुण्यात एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भाषणं झाली. यावेळी बोलतान अजित पवार यांनी नव्याने उद्घाटन झालेल्या प्रकल्पांविषयी समाधान व्यक्त करतानाच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांअगोदर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांना पंतप्रधान मोदींसमोरच अप्रत्यक्षपणे टोला लगावल्याचे दिसून आले. अजित पवार यांनी यावेळी जे काही म्हटले त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारांनी ज्या रोखठोकपणे मंचावर जे सांगितलं त्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी कौतुक केलं आहे.
“रोखठोक अजितदादांकडून झणझणीत अंजन! महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम आज अजितदादांनी केले. हे गरजेचे होते व ते फक्त अजित दादाच करू शकतात!” असं ट्वीट करत खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्तुती केली आहे.
तर, “मला पंतप्रधानांना एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. अलीकडे महत्वांच्या पदावर सन्माननीय व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होताय, ती वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीला पटणारी नाहीत. ती मान्य देखील नाहीत.” असं अजित पवार यांनी आज भाषणात म्हटलं होतं.