पुणे (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून खेड पंचायत समितीतील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्या गटातील वाद आता थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. तसेच खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडं राजकारण केले. अजितदादा, तुमच्या आमदाराला वेसण घाला, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गर्भित इशारा दिला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज खेडमध्ये दाखल झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र, खेडमध्ये पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून घाणेरडे राजकारण सुरु आहे, असा आरोप राऊतांनी केला. तसेच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये आलो आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आमदाराला वेसण घालावे, असा सल्ला राऊत यांनी यावेळी दिला.
संजय राऊत यांनी खेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक कुरघोडीच्या राजकारणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राऊत म्हणाले, सरकारमधील पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. खेडमध्ये मात्र वारंवार घटना घडत आहेत. दोन-तीन पक्ष असल्यामुळे भांड्याला भांडं लागतं. अलिखित करार, एकमेकांची माणसं फोडून कुठेही सत्ता स्थापन करायची नाही, असं असेल तर दोन पक्षांनी महिती देऊन समन्वय साधावा”, असं संजय राऊत म्हणाले.
“लोक फोडून सत्ता स्थापन करायची हे खेडमध्ये घडले. पंचायत समितीच्या जागेबाबत हा वाद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडं राजकारण केले. खेडचे विद्यमान आमदार हे शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी लायक नाहीत. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत, ते परंपरेला धरून नाही. अजितदादांना सांगून सुद्धा हे रेटून नेत असतील तर ह्याला माज आला, असं म्हणतात. पंचायत समितीच्या सदस्यांना पैशांच्या अमिषाने पळवून नेले. हा विषय लवकरच आम्ही त्यांच्या प्रमुखांना कळवू”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
“पंचायत समितीचा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. आम्ही देखील फोडाफोडी करू शकतो. आमदार दिलीप मोहिते यांची वागण्याची पद्धत हीच राहिली तर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको राहू पुढच्या वेळी शिवसेनाच आमदार असेल. महाराष्ट्रात सगळीकडे सुरळीत सुरू असताना असं खेड तालुक्यात कुरघोडी होत असेल तर पालकमंत्री यांनी विचार करावा”, असंही राऊत यावेळी म्हणाले.
काय आहे नेमकं प्रकरण ?
खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात दाखल केेलेला अविश्वास ठराव अकरा विरुध्द तीन अशा मतांनी मंजूर झाला .२४ मे ला सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली. या घटनेबाबत खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्याआरोपांची खैरात झाली होती.