लखनऊ (वृत्तसंस्था) समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केल्याचा आरोप केला. आता उत्तर प्रदेश राज्य निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेले ईव्हीएम प्रशिक्षणासाठी नेले जात असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी ईव्हीएममध्ये छेडछाड करत असल्याचा आरोप केला होता आणि वाराणसीचे जिल्हाधिकारी उमेदवारांकडे कुठलीही माहिती न देता ते घेऊन जात होते, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. अखिलेश यादव यांच्या आरोपांना राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (सीईओ) यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी निवेदन जारी केले आहे. वाराणसी जिल्ह्यात काही ईव्हीएम वाहनात नेले जात असल्याचे काही राजकीय पक्षांनी आमच्या निदर्शनास आणून दिले आहे. तपासात हे ईव्हीएम प्रशिक्षणासाठी नेले जात असल्याचे आढळून आले. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती दिली की हे ईव्हीएम ९ मार्च २०२२ ला राज्यातील एका महाविद्यालयातील प्रशिक्षण ठिकाणी नेले जात होते आणि ते एका अन्नधान्य गोदामात ठेवण्यात आले होते, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले.
हे ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये घेऊन जात असताना, एका राजकीय पक्षाच्या काही सदस्यांनी वाहन थांबवले आणि मतमोजणीसाठी वाहनात ईव्हीएम असल्याची अफवा पसरवण्यास सुरवात केली, असे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले. आरोपांनंतर वाराणसीचे जिल्हाधिकारी कैशल राज शर्मा यांनी मंगळवारी अनेक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधिंसोबत बैठक घेतली. जवळपास २० ईव्हीएम हे प्रशिक्षणासाठी यूपी कॉलेजला नेण्यात येत होते. काही राजकीय कार्यकर्त्यांनी वाहन रोखले आणि मतदान झालेले ईव्हीएम नेत असल्याचा दावा केला. पण स्ट्राँग रूम वेगळी आहे आणि पकडण्यात आलेली ईव्हीएम मशिन्स हे वेगळे आहेत. मतमोजणीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यां प्रशिक्षणासाठी या मशिन्सचा उपयोग करण्यात येतो. यामुळे पकडलेले २० ईव्हीएमचा मतदानासाठी उपयोग झालेला नाही. ते प्रशिक्षणासाठी पाठण्यात येत होते, असे वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितले.