भुसावळ (प्रतिनिधी) शहरालगतच्या कंडारी येथील नागसेन कॉलनीत जावळाच्या कार्यक्रमाला आलेला अकोला येथील तरुणाचा तापी नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजे पूर्वी तापी पात्रात घडली. करण उर्फ सागर शिवशंकर अटवाल (वय २२) असे मृताचे नाव आहे.
सागर अटवाल महादेव मंदिराजवळील अकोला येथील रहिवासी करण उर्फ सागर अटवाल हा कंडारी येथील नागसेन कॉलनीतील सुरेश हटकर यांच्याकडे जावळाच्या कार्यक्रमासाठी आला होता. तो सकाळी कंडारी जवळील तापी नदीत पोहण्यासाठी गेला. यावेळी डोहातील कपारीत अडकल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, करण तापीत बुडाल्याची माहिती मिळताच गावातील तरुणांनी तत्काळ नदीत उड्या मारून त्याला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. करणला वाचवण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. पोलिस पाटील रामा तायडे यांनी या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली.
यानंतर निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप चौधरी, कर्मचारी राहूल भोई व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सरपंच दीपक तायडे, अजय मोरे यांनी सहकार्य केले. ग्रामीण रुग्णालयात करणचे शवविच्छेदन झाले. अकस्मात मृत्यूची नोंद झाली.