बंगळुरू (वृत्तसंस्था) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात शनिवारी कर्नाटक पोलिसांनी एफआयआर दाखल केला. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी वसूल केल्याच्या आरोपाखाली विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
जनाधिकार संघर्ष परिषदेचे सह अध्यक्ष आदर्श आर. अय्यर यांनी सीतारामन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीच्या आधारावर कें द्रीय अर्थमंत्र्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती त्यांनी आमदार-खासदारांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाला केली होती. सीतारामन यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी आरोप आहे. विशेष न्यायालयाने या याचिकेची दखल घेत बंगळुरूच्या टिळकनगर पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी एफआयआर नोंदवला. यामध्ये सीतारामन या प्रमुख आरोपी आहेत.
ईडीच्या अधिकाऱ्यांना दुसऱ्या क्रमांकाचे आरोपी करण्यात आले आहे. याशिवाय भाजपचे पदाधिकारी, कर्नाटकातील माजी भाजप खासदार नलिन कुमार कातिल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र हेदेखील आरोपी आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचालकांवर धाड, जप्ती, अटकेची कारवाई केली. यामुळे भीतीपोटी कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी करून राजकीय पक्षाला देणग्या दिल्या, असा तक्रारदाराचा आरोप आहे.