बीड (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर व त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांनी धक्काबुक्की करून आपल्याला घराबाहेर काढल्याचा आरोप त्यांचे वडिल रवींद्र क्षीरसागर यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
रवींद्र क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमदार संदीप क्षीरसागर हे मद्य प्राशन करून घरात आले. तुमच्या बहिणीला का बोलवले असे म्हणत रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढल्याचे म्हटले आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. संदीप यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी आपल्या दुसऱ्या मुलाविरोधातही फिर्याद दिली आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्यासह त्यांचे भाऊ अर्जुन क्षीरसागर यांच्यावर देखील गुन्हाची नोंद आहे. क्षीरसागर बंधूंवर कलम 323, 504, 506, 34 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.