धरणगाव (प्रतिनिधी) जाहिर कुस्ती दंगलीला परवानगी आणि कुस्तिगिरांच्या विविध मागण्यांसाठी प्रसिद्ध मल्ल भानुदास विसावे यांच्यासह जिल्हाभरातील पहिलवान सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.
श्रावणमास हा महाराष्ट्रभर यात्रा उत्सवांचा महिना मानला जातो. या निमित्ताने ठिकठिकाणी कुस्त्यांचा दंगली होतात. पहिलवान लोकांना लाखो रुपयांची बक्षिस जिंकता येतात. कुस्त्यांचे आखाडे माणसांनी फुलतात.मात्र दिड वर्षापासून लॉकडाऊनमुळे व्यायाम शाळा, कुस्तीचे आखाडे बंद पडले आहेत. यामुळे पहिलवान लोकांनी कसरत करणेच सोडले असून कुस्तीच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पहिलवान, मल्ल लोकांना जीवन जगणे अशक्य झाले आहे. त्यांची ही कैफियत शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाभरातील पहिलवान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.
जाहिर कुस्ती दंगलीला परवानगी आणि कुस्तिगिरांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार दि. २३ ऑगस्ट सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पहिलवान जमणार आहेत. या प्रसंगी जिल्हा कुस्तीगीर परीषदेचे जिल्हाध्यक्ष राजीव देशमुख आणि कुस्ती मल्लविद्या जिल्हाध्यक्ष पहेलवान आण्णा कोळी यांच्यासह जिल्हाभरातील पहिलवान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.
यासाठी कुस्तिगिर संघाचे पदाधिकारी, सदस्य, पहिलवान यांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमावे असे आवाहन धरणगाव येथील व्यायामप्रसारक मंडळाचे अध्यक्ष खान्देशातील सुप्रसिद्ध पहिलवान भानुदास विसावे यांनी केले आहे.