अमळनेर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व हमाल, मापाडी, गुमास्ता, सुरक्षारक्षक व कार्यालयीन कर्मचारी अशा ४०० लोकांचा तीन वर्षासाठी प्रत्येकी दोन लाखाचा विमा बाजारसमितीतर्फे मोफत काढण्यात आला. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते ओरिएंटेड इन्श्युरांस कंपनीच्या अधिकाऱ्यांना नुकताच विम्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले की, कोरोनाच्या काळात अन्न धान्य जीवनावश्यक वस्तूत मोडते म्हणून गरीब कष्टकरी हमाल, मापाडी, गुमास्ता यांना देखील काम करावेच लागते. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या काळात ५ ते ७ जणांचा मृत्यू झाला. त्यांनतर त्या कुटुंबाची परिस्थिती बिकट होते. त्यामुळे बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या विम्याची जबाबदारी बाजार समितीने घेऊन कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावली आहे. मागच्या चुका दुरुस्त करून उत्पन्न वाढवण्याचे काम सुरू आहे. लवकरच बाजार समितीचा पातोंडा येथे पेट्रोलपंप सुरू करून उत्पन्नांत भर पडणार आहे. तर सामाजिक देणे म्हणून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शासनाला मदत म्हणून बाजारसमिती योगदान देणार आहे. मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी सांगितले की, माजी आमदार साहेबराव पाटील यांनी उन्हातान्हात काम करणाऱ्या कष्टकरी हमाल, मापाडी, गुमास्तांसाठी २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून गाळण चाळण प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत प्रशासक किरण पवार आणि दिवंगत संचालक हिम्मत पाटील यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या विम्याची रकमेचा धनादेश आमदार अनिल पाटील यांनी विमा अधिकारी विनायक जाधव, प्रशांत लंगरे यांच्या स्वाधीन केला. या विम्यात कामगारांचा अपघाती मृत्यू, अपंगत्व याची जोखीम घेण्यात आली आहे. याप्रसंगी मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, प्रशासक बी. के. सूर्यवंशी, प्रा. सुरेश पाटील, जितेंद्र राजपूत, एल. टी. पाटील, शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील, भाईदास अहिरे, कामगार संघटनेचे सचिव प्रभाकर पाटील, उपाध्यक्ष अरुण भोई आणि लक्ष्मण पाटील डॉ. उन्मेष राठोड, उपसचिव मंगलगीर गोसावी, सहसचिव सुनील शिसोदे, महेश पाटील आदी उपस्थित होते.