अमळनेर (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी व हमाल बांधवांसाठी असलेले न्याहरी केंद्र अमळनेर महिला मंच बचत गटाला चालविण्यासाठी देण्यात आले असून राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्वरूची उपहार गृहाचा शुभारंभ काल दि. २९ रोजी करण्यात आला.
सदर न्याहरी केंद्र महिला बचत गटास देण्यात आल्याने आता या केंद्रावर माता भगिनींच्या हाताची चव चाखायला मिळणार असून यामुळे निश्चितपणे शेतकरी व हमाल बांधवांची क्षुधाशांती होणार आहे. सदर उपहार गृहाचे उदघाटन अमळनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, बाजार समितीच्या प्रशासक तिलोत्तमा रविंद्र पाटील व जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. याचवेळी खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवर आणि महिला भगिनींच्या हस्ते केक कापून त्यांना उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी अमळनेर महिला मंचच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा मुठे, प्रा शिला पाटील, सरोज भांडारकर, प्रा रंजना देशमुख, भारती गाला, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, शहराध्यक्ष आशा चावरीया, अलका पवार, कंचन शहा, भारती शिंदे, आशा शिंदे, विजया देसरडा, पदमजा पाटील, मार्केट प्रशासक प्रा. सुरेश विक्रम पाटील, संभाजी लोटन पाटील, बी के सूर्यवंशी, विजय पाटील, भाईदास अहिरे, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष अलीम मुजावर, मार्केटचे सचिव डॉ. उन्मेशकुमार राठोड सहसचिव सुनिल शिसोदे, बाबा गोसावी, सुनिल पाटील यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.
दरम्यान बाजार समितीतील हे न्याहरी केंद्र तथा उपहार गृह आतापर्यंत अनेकांनी चालवले असताना या उपहारगृहात यापूढे माता भगिनींची ममता व त्यांच्या हाताच्या चवीचा आस्वाद शेतकरी व हमाल बांधवाना मिळावा, यासाठी मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी हे केंद्र महिला मंडळ अथवा महिला बचत गटांना देण्याचा निर्णय सर्व प्रशासक मंडळाशी चर्चा करून घेतला. यात अमळनेर महिला मंच बचत गट हे केंद्र चालविण्यास सक्षम वाटल्याने बाजार समितीने या मंचला हे केंद्र चालविण्यासाठी दिले आहे. महिला कारागिरांच्या माध्यमातूनच हे केंद्र चालविन्यात येणार आहे. सदर केंद्राचे वैशिष्ट म्हणजे येथे परिपूर्ण स्वच्छतेसह पर्यावरण पूरक म्हणून युज अँड थ्रो च्या वस्तू टाळण्यात येणार आहे. याशिवाय येथे वाजवी दरात रस्सा वडा, पाववडा, पोहे, दशमी, साबुदाणा खिचडी आदी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय लवकरच येथे भाजी भाकर पार्सल सेवा सुरू करण्याचा मानस महिला मंचच्या सदस्यांनी यावेळी व्यक्त केला.