अमळनेर(प्रतिनिधी) विद्यार्थिनींच्या बौद्धिक विकासासाठी अमळनेर नगरपरिषदेची सावित्रीबाई फुले अभ्यासिकेला आजपासून सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी सावित्रीबाई फुले व विद्येची देवता सरस्वती यांचे प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सांगितले की, तालुक्यातील व शहरातील विद्यार्थिनींनी सदर अभ्यासिकेचा योग्य पद्धतीने वापर करून आपल्या बौद्धिक ज्ञानात वाढ करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत.अमळनेर तालुक्यातून येत्या काळात जास्तीत जास्त अधिकारी कसे तयार होतील या हेतूनेच अभ्यासिकेची निर्मिती नगरपरिषदेने केली आहे. तसेच यावेळी नगरपरिषेदेच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांनी देखील आपल्या मनोगतातुन स्त्रियांनी आपल्या पायावर उभे राहून, समाजात एक ओळख निर्माण केली पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशाची शिखरे पार करावीत अशा शुभेच्छा देखील यावेळी त्यांनी दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. शहरात येऊन देखील हक्काची अशी जागा अभ्यासासाठी त्यांना नव्हती,नगरपरिषदेच्या अभ्यासिकेच्या उदघाटनानंतर एक आशेचा किरण त्यांच्यामध्ये निर्माण झाला, अभ्यासिका लवकरात लवकर सुरू व्हावी म्हणून विद्यार्थिनींच एक शिष्टमंडळ दादांच्या भेटीला गेलं व दादांनी तात्काळ त्याची दखल घेत अभ्यासिकेच फक्त उदघाटनच नाही तर ती आता विद्यार्थीनींच्या अभ्यासासाठी सुरू देखील केली.
या अभ्यासिकेत एकाच वेळी ६० विद्यार्थिनी बसू शकतील परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोसिएल डिस्टनसिंग च्या नियमच पालन आवश्यक असल्यामुळे ३० विद्यार्थिनींना प्रवेश असेल.नगरपरिषदेने अमळनेर महिला मंच ला सध्या ही अभ्यासिका चालवण्यासाठी दिलेली आहे. याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील, बांधकाम सभापती मनोज पाटील, विक्रांत पाटील, अपर्णा मुठे, राजश्री पाटील, संजय चौधरी, रवि पाटील, नगरपरिषदेचे कर्मचारी व अमळनेर महिला मंचच्या सदस्य महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.