अमळनेर (प्रतिनिधी) एका महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना दि. २२ रोजी सकाळी गांधलीपुरा भागात मेहतर कॉलनीत घडली होती. पोलिसांनी अवघ्या तीन तासात घटना उघडकीस आणत संशयित मंगला परशुराम घोगले व तिचा प्रियकर करण मोहन घटायडे (वय ३४ रा अयोध्या नगर बंगाली फाईल) या दोघांना अटक केली. दरम्यान, आईची अनुकंपाची नोकरी वहिनीला मिळण्याऐवजी आपल्याला मिळावी, म्हणून नंदेने प्रियकराच्या मदतीने भावजयीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आले आहे.
नेमकं काय घडलं !
नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून पारोबाई परशुराम घोगले (वय ५५) या नोकरीस आहे. त्यांचा मुलगा जय घोगले हा नेहमी आजारी असतो, तसेच त्याला दारुचे व्यसन देखील आहे. पारोबाईची मुलगी मंगला घोगले व सून शीतल जय घोगले या दोन्ही रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास काटेरी झुडूपात शौचास गेल्या होत्या. मात्र मुलगी मंगला ही १० ते १५ मिनिटात परत आली, सुनबाई परत का आली नाही म्हणून पारोबाई यांनी तिच्याकडे विचारणा केली असता, तीने नळ आले आहेत तुम्ही पाणी भरून घ्या, मी कोरडी लाकडे घेऊन येते असे सांगून मला पुढे पाठवल्याचे तीने आईला सांगितले. त्यांनतर मुलगी मंगल ही गांधलीपुरा भागातील लक्ष्मी टॉकीज जवळून मटण घेऊन परत आली तरी देखील सून परत आली नाही. म्हणून सर्व जण तिला शोधायला काटेरी झुडुपात गेले असता शीतल रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. तिच्या हातावर व डोक्यावर वार केलेल्याच्या खुणा दिसून येत होत्या.
सिडीआर रिपोर्टमधून मिळाला महत्वाचा धागा !
तपासचक्रे फिरवल्यानंतर मंगला घोगले हीचा प्रियकर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याबद्दल पोलिसांनी तीची चौकशी केली असता, तीने मी त्याच्यासोबत कधी पासून बोललेली नाही असे सांगितले. मात्र प्रत्यक्ष सिडीआर रिपोर्ट तपासले असता ती वारंवार आणि घटनेच्या आदल्या दिवशी रात्री देखील प्रियकराच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांचा दोघांवर अधिक संशय बळावला.
भावजाईचा खून केल्याची दिली कबुली !
पारोबाई घोगले यांचा मुलगा दारु पित असल्याने तो आजारी होता. त्यामुळे आईच्या जागेवर अनुकंपा तत्वावर शीतल घोगले यांचे काम होईल. जर शीतलच राहिली नाही तर अनुकंपाची नोकरी आपल्याला म्हणजे मंगला घोगले यांना मिळेल. त्यामुळे आपण प्रियकरासोबत आनंदाने जगू या उद्देशाने मंगला घोगले हीने आपला प्रियकर करण मोहन घटायडे (वय ३४ रा अयोध्या नगर बंगाली फाईल) याच्या मदतीने भावजाईचा खून केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली.
सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाला पुरावा !
घटनेची माहिती जाणून घेतल्यानंतर पोलिसांकडून वेगवेगळ्या दिशेने तपास सुरु केला. पोलिसांनी शीतल सोबत गेलेल्या मंगला हिचीच चौकशी सुरू केली. मंगला हिने मी शौचाहून अवघ्या पाच मिनिटात परत आली असे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांना ती सीसीटीव्हीमध्ये तब्बल २५ मिनिटांनी परत येतांना दिसल्याने पोलिसांना तिच्यावरील संशय अधिक बळावला आणि ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी !
ही घटना कळताच रुग्णालयात नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जो पर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, तसेच पोस्टमार्टम पारदर्शी झाले पाहिजे असल्याची मागणी नातेवाईकांनी लावून धरली. त्यामुळे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी मृत महिलेचे शव इंनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. शीतलच्या सासूच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.