अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील आमदार अनिल पाटील यांच्या कार्यालयासमोरील नर्सरी येथे प्रेम विवाह देणाऱ्या एकाला रस्त्यावर अडवून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी चौकशी अंती शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता एकावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र प्रेमसिंग गिरासे वय-४८, रा. कळमसरे ता.अमळनेर हे शेतकरी आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांच्या पुतणीने प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाह करण्याच्या वेळी जितेंद्र गिरासे यांनी विरोध केला होता. या रागातून ११ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी सनी पाटील रा. तांबेपुरा अमळनेर याने अमळनेर शहरातील आमदार अनिल पाटील यांच्या कार्यालयासमोरील नर्सरीजवळ जितेंद्र गिरासे यांचा रस्ता अडवून त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी जितेंद्र गिरासे यांनी शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता अमळनेर पोलिसात घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सनी पाटील यांच्या विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहे.