अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर परिसरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांचा पर्दाफाश करत अमळनेर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि डम्प डेटा यांच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी एक सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे १ लाख ३० हजार रुपयांच्या चोरीस गेलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी (जळगाव), अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ), उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस हवालदार मिलींद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे, चंद्रकांत पाटील, विनोद सोनवणे तसेच पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील व मिलींद जाधव यांचा समावेश होता.
अमळनेर पोलीस स्टेशनकडील गुन्हा र.नं. 503/2025 व 13/2026 (भारतीय न्याय संहिता कलम 303(2)) अंतर्गत दाखल प्रकरणांतील चोरीस गेलेल्या मोटारसायकली व अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांनी अमळनेर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि ठिकठिकाणचा डम्प डेटा काढून संशयितांचा माग काढण्यात आला.
या तपासादरम्यान अरबाज शेख साजीद मनियार (वय २८, रा. धुळे) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत तसेच इतर पोलीस स्टेशन हद्दीत एक विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत आरोपीने चोरीच्या मोटारसायकली धुळे शहरात लपविल्याचे सांगितले.
अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या परवानगीने आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या सूचनेनुसार पोलिस पथकाने धुळे शहरात जाऊन खालील मोटारसायकली जप्त केल्या –
हिरो स्प्लेंडर प्लस डीआरएस (काळा व ग्रे रंग) क्र. MH19-EJ5439, किंमत सुमारे ₹30,000
सुझुकी अॅक्सेस 125 (काळी रंगाची स्कुटी) क्र. MH18-BY6692, किंमत सुमारे ₹50,000
सुझुकी अॅक्सेस 125 (निळ्या रंगाची स्कुटी) क्र. MH39-AN8269, किंमत सुमारे ₹50,000
अशा प्रकारे एकूण ₹1,30,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त मोटारसायकलींचा सविस्तर पंचनामा करून त्या अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्या आहेत. आरोपी अरबाज शेख साजीद मनियार यास अमळनेर पोलीस स्टेशनकडील गुन्हा र.नं. 308/2025 (भारतीय न्याय संहिता कलम 303(2)) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील करीत असून तपास पोलीस हवालदार मिलींद सोनार करीत आहेत. अमळनेर पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, चोरीच्या घटनांवर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















