अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चौबारी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने आईसोबत पाणी पिण्याचे पाणी घेण्यासाठी गेलेल्या एका ८ वर्षाच्या चिमुकलीचा जागीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता मारवड पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखमा विजय नाईक (वय ८ रा. नंदुरबार ह.मु.चौबारी ता.अमळनेर) असे मयत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील रहिवाशी असलेले विजय गुला नाईक वय २८ हे अमळनेर तालुक्यातील चौबारी गावात पत्नी संगिता आणि चिमुकली रेखमा यांच्यासोबत वास्तव्याला आहे. बुधवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास संगिता नाईक ह्या पिण्याचे पाणी घेण्यासाठी चौबारी गावातील रस्त्याने पायी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत चिमुकली रेखमा ही देखील होती. मायलेकी पायी जात असतांना पाडसेकडून चौबारीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०२ बीजे ५४२० ने चिमुकली रेखमा हिला जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर वाहन घेवून चालक फरार झाला. याप्रकरणी गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी रोजी रात्री १०.३० वाजता मारवड पोलीस ठाण्यात विजय नाईक यांनी तक्रार दिली. त्यानुसार चारचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शरीफ खान हे करीत आहे.