पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अॅमेझॉनमध्ये सुरु असलेला वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस आल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून पुण्यातील अॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
मराठी भाषेला आपल्या वेबसाइटवर स्थान द्यावे, अशी मागणी मनसेने ॲमेझोनकडे केली होती. तसं केल्यास मराठी लोकांना सोपे होईल आणि ते वेबसाइटवरून आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणं आहे. मात्र, ॲमेझोनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने ॲमेझोनविरोधात मोहीम हाती घेतली. मनसे आणि ॲमेझोन यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ वाद आता चांगलाच चिघळला आहे. आता हा वाद कोर्टातही गेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला ॲमेझोननं कायदेशीर नोटीस बजवली आहे. मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईतील ॲमेझोन कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात उपस्थित राहण्यास मज्जव करण्यात आला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढल्या ५ जानेवारीला त्याची इच्छा असल्यास उपस्थित राहू शकतात, असं दिंडोशी कोर्टानं बजावलेल्या नोटिशीत म्हटलं आहे. ॲमेझोनच्या ॲपवर इतर भाषाप्रमाणे मराठीला सामावून घेण्याचा मनसेचा आग्रह आहे. त्याला ॲमेझोन सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने हा वाद सुरू झाला आहे. मनसेच्या वतीने ‘नो मराठी नो ॲमेझोन’ ही मोहीम राबवली जात आहे.
अॅमेझॉनने मनसेच्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात न्यायालयात धाव घेतल्यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना न्यायालयाने ५ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने अॅमेझॉनला दिला होता. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अॅमेझॉनला सह्याद्रीचे पाणी पाजणार, अशी प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी दिली होती.