अहमदाबाद (वृत्तसंस्था) अहमदाबाद पोलिसांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याआधी वेजलपूर भागातील उंचच उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घराचे दरवाजे-खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अमित शाह शनिवारीच अहमदाबादला पोहोचले आहेत. भेटीदरम्यान ते शहरातल्या अनेक योजनांचं उद्घाटन करणार आहेत. यामध्ये वेजलपूर इथल्या सामूहिक भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचादेखील समावेश आहे. याच सामुदायिक भवनाच्या परिसरात असणाऱ्या उंच सोसायट्यांच्या चेअरमनना स्थानिक पोलिसांनी एक आदेश दिला आहे. ९ जुलै रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, ११ जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत लोकांना बंदिस्त राहण्याची टाकीद देण्यात आली आहे.
गृहमंत्री वेजलपूर इथल्या सामुदायिक भवनाचं उद्घाटन करणार आहेत. त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं की, “हे सुरक्षेच्या कारणास्तव केलं जात आहे. या परिसरात अनेक उंच इमारती आहेत. अशा परिस्थितीत एकाचवेळी सगळीकडे बंदोबस्त ठेवणं पोलिसांना शक्य होणार नाही. लोकांनी यासाठी मदत केली, दरवाजे खिडक्या बंद ठेवल्या, कार्यक्रम झाल्यानंतर उघडल्या तर पोलिसांना सोयीचं ठरेल.” लोकांनी या आदेशाचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते असं त्यांना विचारलं असता ते म्हणाले, हे एकप्रकारचं आवाहन आहे. सूचनांचं पालन केलं नाही तर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
गृहमंत्र्यांसाठी झेड प्लस सुरक्षायंत्रणा
देशाच्या गृहमंत्र्यांसाठी झेड प्लस सुरक्षायंत्रणा आहे. देशातली ही अतिशय ताकदवान सुरक्षा यंत्रणा मानली जाते. झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात येणाऱ्या व्यक्तीसाठी ३६ सुरक्षा रक्षकांचा ताफा सज्ज असतो. या ताफ्यात नॅशनल सेक्युरिटी गार्ड्स आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप्सचे कमांडोंचा समावेश असतो. पहिल्या तुकडीत नॅशनल सेक्युरिटीचे कमांडो असतात तर दुसऱ्यामध्ये एसपीजी कमांडो असतात. याव्यतिरिक्त आयटीबीपी आणि सीआरपीएफचे जवानही असतात.