चाळीसगाव (प्रतिनिधी) बसमध्ये चढणाऱ्या वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कापून ती लांबणाऱ्या ठाणे येथील चोरट्यास प्रवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील वरखेडे बुद्रुक येथील ६९ वर्षीय वृद्ध महिला चाळीसगाव बस स्थानकात बसमध्ये चढत असताना अंबरनाथ (ठाणे) येथील आरोपीने त्यांच्या हातातील ६० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम सोन्याची बांगडी कटरने कापून पलायन करत होता. याच वेळी प्रवाशांच्या मदतीने संशयित कुणाल सुनील गायकवाड (२८, रा. चंद्राबाई चाळ, वडारपाडा, अंबरनाथ, जि. ठाणे) यास पोलिस कॉन्स्टेबल दीपक चौधरी यांनी पकडल्याची घटना ९ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वृद्धेच्या फिर्यादीवरून कुणाल गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून सोन्याची बांगडी हस्तगत करण्यात आली आहे.
दरम्यान, संशयिताला पोलिस ठाण्यात आणले असता पोलिस निरीक्षक के. के. पाटील, सपोनि दीपक बिरारी, सागर ढिकले, उपनिरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनात डीबीचे हवालदार राहुल सोनवणे, कॉन्स्टेबल विनोद खैरनार, विजय पाटील, प्रवीण जाधव, रवींद्र बच्छे आदी पथकाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत सोन्याची बांगडी काढून दिली. हा संशयित सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी वर्तवली आहे. तर त्याने कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई रेल्वे, सांगली, नंदुरबार जिल्ह्यात ही गुन्हे केल्याची माहिती मिळाली.