पुणे (वृत्तसंस्था) दारू पिऊन त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा वयोवृद्ध मजूर दाम्पत्याने सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी मजूर दाम्पत्यासह सुपारी घेऊन खून करणारे तिघे अशा पाच जणांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ पोपट बाराते असे खून झालेल्याचे नाव आहे. पोपट भानुदास बाराते, मुक्ताबाई पोपट बाराते, बबलू तानाजी पवार, बाबासाहेब ऊर्फ भाऊ गजानन गाढवे, अक्षय चंद्रकांत पाडळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तलावात आढळला होता मृतदेह !
२६ मे रोजी एका ३० ते ४० वयोगटातील अनोळखी युवकाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह दोरी व तारेने मोठे दगड बांधून बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील तलावात फेकून दिला होता. त्यानंतर दाखल झालेल्या या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तालुका पोलिसांचे तपास पथक आजूबाजूच्या गावात तपास करीत होते. याच दरम्यान पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना दौंड तालुक्यातील रावणगाव येथील कुटुंबाबाबत माहिती मिळाली. पोपट बाराते, त्यांची पत्नी मुक्ताबाई व मुलगा सौरभ हे गावातून गेल्या तीन महिन्यांपूर्वी अचानक गायब झाले होते. त्यानंतर १५ दिवसांनी केवळ बाराते दाम्पत्यच गावातील घरी परत आले. मात्र, मुलगा सौरभ हा त्यांच्यासोबत आला नसल्याची माहिती मोरे यांना मिळाली.
१ लाख ७५ हजार रुपयांची सुपारी !
पोलिसांनी शुक्रवारी (दि.३१) पोपट बाराते याच्याकडे मुलगा सौरभ व पत्नी मुक्ताबाई यांच्या ठावठिकाणाबाबत विचारणा केली. यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मला काही माहीत नाही, माझ्या पत्नीला विचारा असे सांगितले. त्यावर पोलिसांनी बाराते दाम्पत्याची मुलगी नीलम खुरंगे (रा. खुरंगेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हिच्याकडे गेलेल्या मुक्ताबाई बारातेचा शोध घेतला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुलगा सौरभ दारू पिऊन येऊन मला मारहाण करून, मला व माझे पती पोपट यांना त्रास देत होता. त्यामुळे गावातील बबलू पवार याला मुलगा सौरभला जिवे मारण्यासाठी १ लाख ७५ हजार रुपयांची सुपारी दिली होती. त्यानुसार बबलू याने त्याचे मित्र बाबासाहेब गाढवे, अक्षय पाडळे अशा तिघांनी सौरभला ठार मारल्याची कबुली मुक्ताबाईने दिली. त्याचा मृतदेह शिर्सुफळ येथील तलावामध्ये दगड बांधून टाकून दिल्याचेदेखील सांगितले. त्यानंतर गुन्हयातील आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
यांनी केली गुन्ह्याची उकल !
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, सहायक फौजदार कल्याण शिंगाडे, राम कानगुडे, सुरेश दडस, गोदेश्वर पवार, सदाशिव बंडगर, संतोष मखरे, दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, महेश कळसाईत यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे हे तपास करीत आहेत.