वर्धा (वृत्तसंस्था) ताडगाव येथे शेतात काम करीत असलेल्या वृद्ध शेतकऱ्यावर वाघाने जीवघेणा हल्ला चढवित २०० मिटर जंगलात ओढून नेऊन ठार केल्याची घटना आज मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. गोविंदा लहानु चौधरी (वय ६१, रा. ताडगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोविंदा चौधरी हे घरुन आपले बैल घेऊन शेतामध्ये गेले होते. दरम्यान झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवित त्यांना जवळपास २०० मिटर जंगलात ओढत नेऊन ठार केले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता शेतकरी गोविंदा चौधरी शेतात आढळून आले नाही. त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह शेतापासून २०० मिटर अंतरावर आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभाच्या अधिकारी कर्मचारयांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
यावेळी वनविभाच्या वतीने मृतकाचे कुटुंबियांना १० लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. तर उर्वरित १५ लाख रुपये फिक्स डिपॉझीटमध्ये टाकण्याचे आश्वासन दिले. गिरड पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता समुद्रपुर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. परिसरात गेल्या अनेक दिवसापासून वाघ व बिबट यांचा मुक्त संचार आहे. शेतकरी शेतमजूर व गुराखी यांना त्यांचे नियमित दर्शन होत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.