जळगाव (प्रतिनिधी) तुझ्या मुलाने आमची मुलगी पळविली आहे, तु या गावात कसा आला असे म्हणत जमावाने चंद्रभान किटकुल सोनवणे (वय ७३, मूळ रा. नांद्रा बु. ह. मु. हरिओम नगर, जैनाबाद) यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना दि. ७ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नांद्रा बु. गावात घडली. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जैनाबादमधील हरिओम नगरात राहणारे चंद्रभान सोनवणे हे वृद्ध आपल्या मूळ गावी गेले होते. यावेळी त्यांच्या घरासमोर तुळसाबाई बाविस्कर, कल्पनाबाई बाविस्कर, मनिषा बाविस्कर, विजय बाविस्कर हे त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी तुझ्या मुलाने आमची मुलगी पळविली आहे, तु या गावात परत कसा आला असे म्हणत त्यांना शिवीगाळ करु लागल्या. त्यावेळी पवन बाविस्कर, सचिन बाविस्कर हे देखील त्याठिकाणी आले, त्यांनी तु गावात कसा आला असे म्हणत पवन बाविस्कर याने वृद्धाच्या डोक्यात बुक्का मारला तर सचिन याने कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावल्या. थोड्या वेळानंतर वृद्ध हे नांद्रा फाट्याजवळ आले असता, त्याठिकाणी भुवनेश्वर बाविसकर, कुणाल बाविस्कर उभे हाते. त्यांनी तु या पुढे गावात आला तर तुझे हातपाय तोडू अशी धमकी देत लाथाबुक्क्याने मारहाण केली.
८ जणांविरुद्ध तक्रार
मारहाणीत जखमी झालेले वृद्ध चंद्रभान सोनवणे हे जळगावात आल्यानंतर त्यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार तुळसाबाई बळीराम बाविस्कर, कल्पनाबाई श्रावण बाविस्कर, मनिषा पिंटू बाविस्कर, विजय श्रावण बाविस्कर, पवन विजय बाविस्कर, सचिन विजय बाविस्कर, भुवनेश्वर पिंटू बाविस्कर, कुणाल बळीराम बाविस्कर (सर्व रा. हरिओम नगर, मूळ नांद्रा बु. ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ किरण आगोणे करीत आहे.
















