धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव रोडवरील हॉटेल अमोलच्या पुढे एका अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पती ठार तर पत्नी जखमी झाल्याची घटना दि.१३ रोजी दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव किसन पाटील (वय ५६ रा. दहीगाव ता. पारोळा), असे मयताचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि.१३ रोजी दुपारी नामदेव किसन पाटील आणि शोभाबाई नामदेव पाटील असे दोघं जण मोटार सायकल क्र. (MH १९ CQ १५७७) हिच्याने भोद ता. धरणगाव येथे होते. धरणगाव ते पिंप्री गावाच्या दरम्यान अमोल हॉटेलच्या पुढे रोडवर चालत असतांना दुपारी एक वाजेच्या सुमारास मोटर सायकलला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली.
या अपघातात नामदेव पाटील यांच्या डोक्यास गंभीर मार लागून दुखापत झाली. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर शोभाबाई या देखील जखमी झाल्यात. या प्रकरणी हितेंद्र नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील (चालक नाव-गाव माहित नाही) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ. करीम सैय्यद हे करीत आहेत.