छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) शिऊर तालुक्यातील वैजापूर शिऊर बंगल्याकडून शिऊरकडे मोटरसायकलवर जात असताना आश्रम शाळेजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका व्यक्तीसह महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
शिऊर बंगल्याकडून शिऊरकडे विना क्रमाकांच्या मोटरसायकलवरून जात असलेल्या दोघांना वैजापूरकडून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात विजय साहेबराव निकम (४५) (रा. शिऊर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मंगलबाई अशोक गायकवाड (४५ रा. वाडी बनोटी ता. सोयगाव) या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील, फौजदार आर. आर. जाधव, सविता वरपे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेस शिऊर येथील प्राथमिक केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषीत केले. अपघातात मोटरसायकलचा चुराडा झाला आहे.