जळगाव (प्रतिनिधी) लहान मोठ्या गुन्ह्यात न्यायालयाद्वारे निर्दोष झाल्यानंतरही पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्रावर संबंधित गुन्ह्याची नोंद येत असते. यामुळे अनेक होतकरू तरुणांवर अन्याय होतोय. यामुळे चारित्र्य पडताळणीत अशा नोंदी न येण्याबाबतची मागणी मनसेचे शॅडो कॅबिनेट सदस्य अँड. जमील देशपांडे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जमील देशपांडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक तरुणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल होवून त्यातील अनेकांची न्यायालयामार्फत निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान अशा तरुणांना शासकीय नोकरी, खाजगी नोकरी, परीवहन विभागात लायसन्स काढणे, प्रवासी वाहतूक करणारी चाहने चालविण्याकरीता बॅच काढणे या करीता पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र गुन्ह्यातुन निर्दोष सुटलेल्या तरुणांच्या पोलीस पडताळणी प्रमाणपत्रावर सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल होता. मात्र न्यायालयाच्या आदेशाने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, असे नमुद होऊन येते.
या प्रकारच्या नोंदीमुळे तरुणांना सरकारी नोकरी, खाजगी नोकरी, शिक्षण, लायसन्स बॅच बनविण्यात मोठी अडचण येत आहे. संबंधित तरुणांना प्रशासकीय स्तरावर व सामाजिक जीवनात मानहानी स्विकारावी लागत आहे. दरम्यान लग्न जमविणे प्रसंगी सुद्धा अनेक पालक पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणात मागवतात. त्यामुळे त्यांच्या पुढील संसारिक जिवनात निराशेचे वातावरण आहे. त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. प्रसंगी तरूण आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलत आहे.
काही तरुणांना नोकरीची संधी असूनही पोलीस चारित्र्य पडताळणीमुळे त्यांना नोकरी मिळू शकलेली नाही. आम्हाला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. अगदी विरुद्ध पक्षाने कोणत्याही उच्च न्यायालयात दाद मागितली नाहीय. तर मग पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्रावर गुन्ह्याचा तपशिल का ? असा प्रश्न तरुणांकडून विचारला जात आहे.
सदर प्रश्न सामाजिक प्रश्न असून पोलीस प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा व निर्दोष सुटलेल्या तरुणांच्या पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्रावर येणारा गुन्ह्याचा तपशिल येणार नाही, याबाबत योग्य तो मार्ग काढावा. कारण जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रश्न आवासुन उभा आहे. त्यामुळे न्यायालयाद्वारे निर्दोष झालेल्या तरुणांना पोलीस प्रशासनाने दिलासा द्यावा, असे अॅड. देशपांडे यांनी म्हटले आहे.