धरणगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातील रसिक आणि परमेश्वरावर नितांत “श्रध्दा असणारा भाविक” ही रूपे अनेकदा दिसून येतात. ते अनेकदा जसे चित्रपटातील गाणी म्हणतात तसेच भजन किर्तनातही रंगतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कव्वालीच्या माध्यमातून भक्तीरंगाचे प्रदर्शन घडविले होते. आता अगदी याच प्रकारे तालुक्यातील अंजनविहिरी गावात आयोजीत करण्यात आलेल्या भागवत सप्ताहात ना. गुलाबराव पाटील यांनी थेट किर्तनात भाग घेऊन उपस्थितांना चकीत केले.
किर्तनाच्या माध्यमातून संस्कारक्षम जीवनाची दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन करत त्यांनी जीवनातील परमेश्वर भक्तीवर केलेले भाष्य हे उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले. तर याच कार्यक्रमात त्यांना दहीहंडीचा सन्मान देखील प्रदान करण्यात आला. धरणगाव तालुक्यातील अंजनविहिरे गावात आयोजित करण्यात आलेल्या भागवत सप्ताहाची आज सांगता होती. या निमित्त सकाळी काल्याच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या संपूर्ण किर्तनाला हजेरी लावली. या ठिकाणी ते दोन तास उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी दहीहंडीचा सन्मान प्रदान करण्यात आला हे विशेष.
याप्रसंगी उपस्थितांच्या आग्रहाला सन्मान देऊन ना. गुलाबराव पाटील यांनी किर्तनकार आणि टाळकर्यांच्या उपस्थितीत आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, जीवनात परमेश्वर भक्ती खूप महत्वाची आणि आपल्याला उर्जा प्रदान करणारी आहे. आपण वर्षभरातून साधारणपणे पन्नासएक किर्तनांना हजेरी लावत असतो. किर्तन हे प्रबोधनाचे अतिशय परिणामकारक असे साधन आहे. ते जीवनात भक्ती आणि शक्तीचे प्रतिक आहे. यातून समाजाला सुधारणेची चालना मिळते. तर कुणालाही यातून संस्कारक्षम जीवनाची दिशा मिळत असते. वारकरी संप्रदायाचा किर्तन हा आत्मा असून याला उपस्थित राहण्याची आपल्याला संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आपण किर्तनाला गेल्यानंतर ते पूर्ण झाल्याशिवाय कधीही उठत नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तर किर्तनातील ज्ञानाचा आपल्याला वैयक्तीक आयुष्यात लाभ झाला असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.