मुंबई (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज अखेर जामीनावर सुटका झाली आहे. आज सव्वा वर्ष म्हणजे 13 महिने 26 दिवसांच्या कोठडीनंतर ते बाहेर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी देशमुख यांचे स्वागत केले. तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
आर्थर रोड (Arthur road) तुरुंगातून ते बाहेर आले. देशमुख यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयची (CBI) मागणी हाय कोर्टाने फेटाळल्यानंतर आज बुधवारी अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आले. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख यांची सुटका झाली. न्यायालयावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांनी दिली. अनिल देशमुख कारागृहाबाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अनिल भाऊ आगे बडो, हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा दिल्या.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातलं ईडी सरकार विरोधात काही करत असेल तर त्याला आधी एजन्सीची भीती दाखवायची.. भुजबळ, राऊत आता देशमुखांचीही केस आपण पाहिली. सव्वा वर्ष अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकलेलं आहे. अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांनी काय झेललंय, हे मी खूप जवळून पाहिल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली. अनिल देशमुखांविरोधात ईडीने 109 वेळा धाड टाकली. पण एकही वेळा काहीही हाती आलं नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. हा जागतिक विक्रम असल्याचंही त्यांनी ठासून सांगितलं.