जळगाव (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील प्राप्त निर्देशान्वये, दि. १ जानेवारी, २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषीत झाला आहे. याचा पात्र मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, १८- पाचोरा विधानसभा मतदार संघ राजेंद्र कचरे यांनी केले आहे.
१८- पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादी निरीक्षक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नाव नोंदणी, मतदार यादी शुध्दाकरणाचे कामकाज नियमित सुरु आहे. यामध्ये ३ लाख १० हजार ३३६ इतक्या मतदारांचे १००% रंगीत छायाचित्र जमा करुन अपलोड करण्यात आलेले आहेत. प्रत्येक पात्र मतदाराने/पात्र व्यक्तीने आपल्या गावातील/यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेशी संपर्क साधून नावनोंदणी तसेच छायाचित्र/नावात अथवा राहत्या पत्त्यात सुधारणा याबाबत विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन तो परीपुर्ण भरुन सादर करावा.
नावनोंदणी/नावात बदल/पत्त्यात अथवा तपशिलात बदल या बाबींना कोणतेही शुल्क लागत नाही. सध्याच्या कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरीकांना घरी बसुनही www.nvsp.in तसेच voter helpline App या प्रणालीवर देखील नाव नोंदणी करता येईल. त्याचबरोबर नव मतदार नाव नोंदणी, नाव वगळणे, नाव/छायाचित्र आदी तपशिलात बदल, एकाच मतदार संघातील रहिवासात बदल याकरीता फॉर्म भरुन बदल करुन घ्यावे. असेही उपविभागीय अधिकारी कचरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.