मुंबई (प्रतिनिधी) केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या चर्चेवर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. पक्षासाठी पायाला फोड येई पर्यंत आम्ही काम केले. भाजपला मला संपवायचे आहे, असे नाही. मी इतकी मोठी नाही की पंतप्रधान मला संविण्यासाठी असे करतील. मी नाराज नाही, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले आहे. मात्र, यावेळी त्या गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाल्या.
यावेळी पंकजा म्हणाल्या की “ज्योतिरादित्य शिंदे यांना फोन करून मंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या. कपिल पाटील, भारती पवार यांनाही मी फोन केला. मी सगळ्यांशी बोलले आहे. मंत्रिपद मिळालेल्या नवीन मंत्र्यांना एक दिवस आधी दिल्लीत बोलवले होते. रात्री १२ वाजता भागवत कराड यांचा मला फोन मला आला होता. त्यांनी सांगितले की मला पक्ष कार्यालयातून फोन आला आहे. त्यामुळे मी दिल्लीत आलो आहे. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी मंत्रिपदाची मागणी केली नव्हती. त्यामुळे नाराज असण्याचा काहीच संबंध नाही, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात कोणतेही पद देण्याची वेळ येते, तेव्हा मुंडेंचे नाव चर्चेत असते. विधान परिषद आणि राज्यसभेसाठी माझेही नाव चर्चेत होते. अन्याय झाला असे समर्थक म्हणतात. त्यावर पंकजा म्हणाल्या, जनता एका नेतृत्वाला उभे करण्यासाठी कष्ट करत असते. त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की आपल्या नेत्याला काही मिळाले पाहिजे.
प्रीतम मुंडे यांचे नाव योग्य होते. त्यांनी चांगले काम केले आहे. महिला आणि बहुजन चेहरा होता. कदाचीत पक्षाने काही निर्णय घेतला असेल. भारतीय जनता पक्षामध्ये निर्णय घेण्याची एक पद्धत आहे. नवीन नवीन लोकांना संधी देण्यामध्ये काय हरकत आहे. नाराज असल्याच्या चर्चा आता थांबल्या पाहिजे. पक्षाने मला अर्ज भरायला लावला होता. आणी नंतर दुसऱ्याला तिकिट दिले. त्यावेळी सुद्धा मी नाराज नव्हते. मी मोठी नेता नाही. राजकारणात आले ते एक व्रत म्हणून आले. मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर मला राजकारणात यावे लागले. मी माझी जबाबदारी पार पाडत आहे. मला फक्त वंजारी म्हणून बघणे चुकीचे आहे. वंजारी समाजातील कोणी माणूस मोठा होत असेल तर मी त्यांच्या मागे उभी राहणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
दोघींना बदनाम करु नका : फडणवीस
मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा निरर्थक असल्याचे सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाच्या वाटपाबाबत सर्व समाधानी आहेत, उगाच भांडणे लावू नयेत. कुणालाही अकारण बदनाम करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असा इशारा दिला.