मुंबई (वृत्तसंस्था) एका नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून आठ महिन्यांच्या चिमुकलीला दारू पाजल्याचा संतापजनक प्रकार डोंबिवलीत घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.
डोंबिवलीत एक ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी आई, बहीण आणि वडिलांसोबत राहते. आई कामानिमित्त गावाला गेलेली होती. यावेळी वासनांध झालेल्या बापाने तिच्याशी लगट करत बलात्कार केला. नराधम बाप तितक्यावरच थांबला नाही. नंतर त्याने पीडित अल्पवयीन मुलीला शिवीगाळ मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. झालेल्या आघाताने मुलगी घाबरून गेली. तिने आई परतल्यानंतर तिला घडलेली घटना सांगितली.
दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन आरोपीनं भांडण केलं. आठ महिन्यांच्या मुलीला दारू पाजली. त्याला विरोध करणाऱ्या पत्नीला देखील नराधमाने बेदम मारहाण केली. या सर्व धक्कादायक प्रकरणानंतर पीडित मुलीच्या आईने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम बापाला बेड्या ठोकल्यात. विष्णुनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांचा मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक एम. बी. कपिला तपास करत आहेत.