मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) पुन्हा चौकशी होणार आहे. त्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नवे समन्स पाठवले आहे. त्यानुसार वर्षा राऊत यांना ११ जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
यापूर्वी ४ जानेवारीला पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.
पीएमसी बँकेतील घोटाळ्याला हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) ही कंपनी जबाबदार आहे. गुरुआशीष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही एचडीआयएलची उप कंपनी आहे. प्रवीण राऊत याच कंपनीत संचालक होते. संचालक असताना त्यांनी एचडीआयएलच्या खात्यातून १.६० कोटी रुपये पत्नी माधुरी यांच्या खात्यात वळवले. माधुरी यांनी याच १.६० कोटी रुपयांपैकी ५५ लाख रुपये वर्षा राऊत यांना व्याजमुक्त कर्ज म्हणून दिले. त्या रक्कमेतून वर्षा यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला. या सर्व घडामोडी २०१०-११ दरम्यान घडल्या. पुढे एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ६,६७० कोटी रुपयांचे कर्ज बुडवले. त्यातून पीएमसी बँक कोसळली. याचाच तपास ईडीकडून केला जात आहे.
वर्षा राऊत यांना नोटीस का?
पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.