जळगाव (प्रतिनिधी) पती कामानिमित्त बाहेर गेले होते तर पत्नी दोन्ही मुलींसह घराशेजारी असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी काशिनाथ प्रभू चव्हाण (वय ३८) यांच्या घरात डल्ला मारला. याठिाकणाहून चोरट्यांनी १ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. १० रोजी दुपारच्या सुमारास मायादेवी नगरातील अरुंधती अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मायादेवी नगरात काशिनाथ प्रभू चव्हाण हे वास्तव्यास असून ते पत्रकार आहेत. दि. १० एप्रिल रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास ते कामानिमित्त बाहेर गेले होते. तर त्यांची पत्नी घराला कुलूप लावून दोघ मुलींना घेवून घराशेजारी असलेल्या ब्युटीपार्लरमध्ये गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटात ठेवलेल्या ८५ हजार रुपयांची रोकड, ३५ हजार रुपयांचे ७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ५ हजारांचे सात भराचे चांदीचे ब्रासलेट असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
घराच्या कुलपासह कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास
काही वेळानंतर काशिनाथ चव्हाण यांच्या पत्नी या घरी परतल्या असता, त्यांना घराला लावलेले कुलूप दिसून आले नाही. तसेच कडीकोयंडा देखील कापलेला दिसल्याने त्यांनी तात्काळ पतीला फोनवरुन घटनेची माहिती दिली. चव्हाण हे घरी आले असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसले.
कपाटाचे लॉकर तोडून ऐवज नेला चोरुन
चोरट्यांनी चव्हाण यांच्या घरातील लोखंडी कपाटातील लॉकरचे कुलूप तोडून त्यातील रोकड आणि सोने-चांदीचे दागिने लांबवून नेले. भरदिवसा चोरट्यांनी अपार्टमेंटमधील घरफोडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी काशिनाथ चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















