जळगाव (प्रतिनिधी) हतनूर मोठा प्रकल्पावरील जलाशय, हतनूर कालवा कि.मी 0 ते 92 पर्यत व तापी नदी, सुकी, अभोरा, तोंडापुर या प्रकल्पावरील कालव्याच्या वितरिकेवर प्रवाही, जलाशय, नदी नाले व कालव्यावर उपसा सिंचनाने पाण्याचा लाभ घेणा-या सर्व लाभधारकांना कळविण्यात येते की, यावर्षी सन 2020-2021 मध्ये रब्बी हंगामात सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठ्यानुसार दि 15 ऑक्टोबर, 2020 ते 28 फेब्रुवारी, 2021 या मुदतीकरीता रब्बी हंगामातील दादर, हरबरा, अन्नधान्य, चा-याची पिके यासाठी खालील अटीचे अधिन राहून सिंचनास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे.
अर्ज नमुना क्र. 7 वर मागणी भरुन पाणी अर्ज दि. 31 डिसेंबर, 2020 पर्यंत आपल्या भागातील शाखाधिकारी यांचे शाखा कार्यालयात कार्यालयीन वेळेत, पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्याचे करावे. यानंतर पाणी अर्जाची मुदत वाढविली जाणार आहे. नविन उपलब्ध होणा-या पाणी साठ्यानुसारच पाणी अर्ज मंजुरीचा विचार केला जाईल. रब्बी हंगाम 2019-2020 पर्यंत थकबाकी पुर्ण भरावी, थकबाकीदारांना मंजूरी दिली जाणार नाही. शेतक-यांनी आपआपली शेतचारी दुरुस्त करुन स्वच्छ ठेवावी, मागणी क्षेत्र 20 आर च्या पटीत व सलग असावे, मागणी क्षेत्रात पाटमोट संबध नसावा, मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जावर सव्वापट आकारणी करण्यात येईल, प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजुरी मिळाली असे समजण्यात येवू नये, मंजुर क्षेत्रास व मंजुर पिकांनाच पाणी घ्यावे लागेल.
अपरीहार्य कारणाने मंजुर पिकासाठी पाणी पुरवठा न करता आल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही व नुकसान भरपाई दिली जाणार नाही. पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा अथवा खाते पुस्तिका संबंधीत पाट शाखेत दाखवावी लागेल, पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत 31 डिसेंबर, 2020 नंतर वाढविली जाणार नाही. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करुन अधिक उत्पन्न घ्यावे. मंजुरी ही पाटबंधारे अधिनियम महाराष्ट्र राज्य 1976 व प्रचलित शासन नियमांच्या तरतुदीच्या अधिन राहील, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रास मंजुरी दिली जाईल. असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.