जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मुरघास निर्मितीकरीता सायलेज बेलर मशीन युनिट स्थापन करणेसाठी जिल्ह्यातील फक्त एका संस्थेस अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ, दुध उत्पादक सहकारी संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयं सहाय्यता बचत गट, गोशाळा, पांजरापोळ संस्था अशा सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांनाच प्राध्यान्यक्रमाणे द्यावयाचा आहे. सदर संस्थेची शिफारस जिल्हास्तरीय राष्ट्रीय पशुधन अभियान समितीमार्फत करण्यात येणार आहे.
सदर योजनेसाठी एका युनीटचा एकुण अंदाजित खर्च रुपये २० लक्ष असून अनुदानाची रक्कम रुपये १० लक्ष आहे. उर्वरित खर्च रुपये १० लक्ष इच्छुक संस्थेने करावयाचा आहे. सदर पात्र संस्था यांना शासन निर्णयातील सर्व अटी शर्तीचे पालन करुन व मागणीनुसार मुरघास उपलब्ध करणे बंधणकारक असणार आहे याची नोंद घ्यावी. अर्ज सादर करणेची अंतिम मुदत दि. १५ मार्च, २०२१ आहे.
सदर अर्ज पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांचेकडे उपलब्ध आहे. तरी पात्र संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन डॉ. शामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.