मुंबई (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी केली जाईल. जे सत्य आहे ते बाहेर येईलच. यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.
गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले जाईल. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल ती केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?
२३ वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितलं होतं. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं. त्यानंतर पूजाने हे टोकाचं पाऊल का उचललं याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. या प्रकरणाच्या ११ कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.
भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं या प्रकरणात नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली आहे. या आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच पुणे पोलीस आयुक्तांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
अरुण राठोड या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पुण पोलिसांकडून सध्या अरुण राठोडचा शोध सुरु आहे. अरुण राठोड हा सध्या बीडमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप याची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.