नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात सध्या उष्णतेने विक्रम (Hot Weather) मोडीत काढला असून दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील लोक उष्णतेच्या लाटेशी झुंज देत आहेत. दरम्यान, हवामान खात्याचे संचालक डॉ एम महापात्रा यांनी देशातील हवामानाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये भारतातील उष्णतेने १२२ वर्षांचा विक्रम मोडला आहे.
हवामान खात्याच्या संचालकांनी माहिती दिली आहे की उत्तर पश्चिम आणि मध्य भारतातील एप्रिलमध्ये सरासरी कमाल तापमान हे अनुक्रमे 35.90 अंश सेल्सिअस आणि 37.78 अंश सेल्सिअससह गेल्या 122 वर्षांतील सर्वोच्च तापमान आहे. त्याच वेळी, त्यांनी असेही सांगितले आहे की पश्चिम-मध्य आणि उत्तर-पश्चिम भारतातील बहुतेक भाग आणि उत्तर-पूर्व भारताच्या उत्तर भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
IMD म्हणते की मे महिन्यात उत्तर-पश्चिम आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये तसेच दक्षिण-पूर्व द्वीपकल्पात पाऊस सामान्यपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. ही क्षेत्रे वगळता, भारताच्या बहुतांश भागात सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिल्लीत गेल्या 72 वर्षांमध्ये एप्रिल महिना इतका उष्ण होण्याची ही दुसरी वेळ आहे, ज्या दरम्यान मासिक सरासरी कमाल तापमान 40.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. IMD नुसार, 2010 मध्ये दिल्लीमध्ये सरासरी मासिक कमाल तापमान 40.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आयएमडीने शनिवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, दिल्लीच्या अनेक भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे.
रविवारी पावसाची शक्यता
दुसरीकडे, IMD ने सांगितले की, रविवारी वातावरण अंशतः ढगाळ असेल, तसेच हलका पाऊस आणि धुळीच्या वादळासह, 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उष्णतेपासून तात्पुरता आराम मिळू शकतो. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली सोमवारपासून उष्णतेची लाट संपेल, ज्याचा परिणाम 1 मेच्या रात्रीपासून उत्तर-पश्चिम भारतावर होण्याची शक्यता आहे.