कोल्हापूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील खानापूर (ता. आजरा) येथे मंगळवारी मध्यरात्री २० ते २५ दरोडेखोरांनी तिघांचे हात-पाय बांधून, मारहाण करून ३० लाखांचा ऐवज लांबविला. यामध्ये सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, २२० यॉकशार्क जातीची पाळीव डुकरे, काजूगर, महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली. दरोडेखोरांच्या मारहाणीत राजेश प्रल्हाद गुरव (30) हे गंभीर जखमी झाले आहेत.
शेतात प्रल्हाद गुरव यांचे राज कॅश्यू इंडस्ट्रीज व अॅग्रो फार्म आहे. येथे ते पत्नी पूनम, मुलगा राजेशसोबत राहतात. मंगळवारी मध्यरात्री पावणे दोनच्या दरम्यान त्यांच्या शेडवजा घराचा दरवाजा दगडाने तोडून डोक्याला काळे कपडे गुंडाळलेले, हातात तलवारी व रॉड घेतलेले २० ते २५ पंधराजण घुसले. त्यांनी गुरव दाम्पत्य व त्यांच्या मुलग्याचे दोरखंडाने हात पाय बांधले. त्यांनी आरडाओरडा करू नये म्हणून त्यांच्या तोंडाला कापड बांधले होते.
गुरव परिवाराने कुणासोबतही संपर्क करू नये म्हणून त्यांचे मोबाईलही फोडले. त्यानंतर दरोडेखोरांनी पूनम यांचे मंगळसूत्र हिसकावले. कपाट फोडून दागिने घेतले. साडेसहा तोळे सोने, चांदीचे दागिने, अडीचशे किलो तयार काजूगर तसेच पाचशे किलो काजू बी आणि २५ हजार रोकड, असे नऊ लाख १७ हजारांची लूट केली. एवढेच नव्हे तर रखवालीच्या कुत्र्यासह डुकरेही टेम्पोत भरून पळविली. दरोडेखोरांनी असा एकूण ३० लाखांचा ऐवज लांबविला. तब्बल २ तास हा थरार सुरू होता. दरम्यान, पोलिसांनी दरोडेखोरांच्या शोधासाठी पाच पथके विविध भागांत रवाना केली आहेत.