जामनेर (प्रतिनिधी) जामनेर बोदवड रोडवरील नवी दाभाडी फाट्या जवळील एका ढाब्यावर बुधवारी रात्री आठ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. जामनेर पोलिसांनी सूत्रे हलवून दरोडेखोरांना तासाभरातच मुक्ताईनगर हद्दीत अटक केली. त्यांच्याजवळ एक गावठी पिस्तूल, चॉपर आणि एक गुप्ती जप्त करण्यात आली.
जामनेर बोदवड रोडवरील वाडी फाट्याजवळ रवींद्र बडगुजर (रा. नवी दाबाडी) यांचा एकाकी ढाबा आहे. या ढाब्यावर काही लोक बसले असताना काही अंतरावर कार लावून चार जण पायी चालत ढाब्यावर आले. त्यांच्यापाठोपाठ आणखी चार जण येऊन त्यापैकी एकाने व्यवस्थापक रवींद्र वाघ यांच्या डोक्याला पिस्तूल लावून गल्ल्याची चावी मागितली. चावी न दिल्याने त्यास लाकडी दांड्याने मारहाण केली. तर दुसऱ्या एकाच्या मानेवर सुरा ठेवून इतरांकळूनही असलेली दीड लाखाचा ऐवज घेऊन दरोडेखोर बोदवडकडे पसार झाले.
याबाबत ढाबा मालक बडगुजर यांनी जामने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी तात्काळ बोदवड मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क करून माहित दिली. माहिती मिळताच नाकाबंदी करण्यात येऊन सदरील आरोपींना मुक्ताईनगर हद्दीत पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेरबंद केले. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहेत.
दरम्यान, मुकेश फकिरा गणेश, शेख भुरा शेख बशीर, शेख शरीफ शेख, सलीम शाहरुख शहा चांद शहा, अझरुद्दीन शेख अमीनुद्दीन, अंकुश तुळशीराम चव्हाण, खजिनदार सिंग कुलबीर सिंग रीन, शेख नय्यूम शेख कयूम अशा आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६९,६५० रुपये रोकडसह पिस्तूल, तीन जिवंत काडतूस, ईरटीगा, चॉपर आदी अन्य साहित्यासह पोलिसांनी जप्त केले आहे.