नांदेड (वृत्तसंस्था) राजस्थान येथे सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानाने मला मुलगी नको होती, मुलगाच पाहिजे होता, असे म्हणत गरोदर पत्नीसह तीन वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी पहाटे घडली. दोघांचा खून केल्यानंतर आरोपीनेच माळाकोळी ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिली.
मागील १० दिवसांपासून सुटीवर आला होता जवान !
कंधार तालुक्यातील पळसवाडी येथील व्यंकटी केंद्रे यांची मुलगी भाग्यश्रीचा विवाह २०१९ मध्ये बोरी खु. येथील (ता. कंधार) एकनाथ मारुती जायेभाये याच्यासोबत झाला होता. एकनाथ जायेभाये हा सैन्यदलात राजस्थानमधील बिकानेर येथे कार्यरत होता. तो मागील १० दिवसांपासून सुटीवर गावी बोरी येथे आला होता. तो गरोदर पत्नी भाग्यश्री (वय २३) व तीन वर्षीय मुलगी सरस्वती व आईवडिलांसह राहत होता.
मला मुलगा पाहिजे, तू डॉक्टरकडे चेकअप कर !
मागील काही दिवसांपासून एकनाथ हा पत्नीस तुला मुलगी कशी झाली. मला मुलगा पाहिजे. तू पुन्हा गरोदर आहेस, आता होणारे अपत्यही मुलगीच आहे. त्यामुळे तू डॉक्टरकडे चेकअप कर. तसेच त्यांच्या संगोपनासाठी व घर बांधकामासाठी माहेराहून चार लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत होता. तसेच भाग्यश्री दुसऱ्यांदा गरोदर झाल्यापासून मागील तीन महिन्यांपासून पती एकनाथ व सासरा मारोती तसेच सासू अनुसया, दीर दयानंद हे गर्भलिंगनिदान चाचणी करण्यासाठी तगादा लावत होते. पण भाग्यश्री हि तपासणी करण्यास तयार नव्हती तेव्हा पासून ते तिचा अतोनात छळ सुरु होता, असे तक्रारारीत भाग्यश्री जायभाये यांची आई देशाला व्यंकटी केंद्रे यांनी माळाकोळी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून आरोपी पती एकनाथ मारोती जायभाये याच्यासह सासरे मारोती रामकिशन जायभाये, सासू अनुसया मारोती जायभाये, दीर दयानंद मारोती जायभाये यांच्याविरुद्ध भादंविच्या ३०२, ४९८ (अ),३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार अधिक तपास करीत आहेत.
तु व्हिडीओ कॉल कर तुला त्यांचे मृतदेह दाखवतो !
माहेरच्या मंडळींकडून पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने त्याने बुधवारी पहाटे पत्नी व तीनवर्षीय चिमुरडीचा गळा आवळून खून केला. ही घटना घडल्यानंतर पळसवाडी येथे सासरवाडीस सासू-सासऱ्यांना मोबाइलवर फोन करून मी तुमच्या मुलीला व नातीला मारून टाकले असल्याची माहिती स्वतःच सांगितली. तु व्हिडीओ कॉल कर तुला त्यांचे मृतदेह दाखवतो, असे जावई एकनाथने सासूबाईंना सांगितले. त्यानंतर नातेवाईकांना त्यांच्या घरी बोरी खुर्द येथे पाठवले. लाकडी पलंगावर भाग्यश्री वनात सरस्वती हे मृत अवस्थेत पडले होते. त्यानंतर एकनाथ जायेभाये हा माळाकोळी पोलीस ठाण्यात हजर झाला.