चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील भारतीय सैन्य दलातील शिपायाची ऑनलाइन फसवणुकीच्या माध्यमातून तब्बल ८ लाख ५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विजय चिंधा राजपूत (वय ४०, रा. छत्रपती संभाजीनगर, खरजाई नाका, चाळीसगाव) असे फसवणूक झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर पोलीस विभागाकडून अधिक तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव येथील विजय राजपूत हे भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून नोकरीला असून त्यांची जम्मू येथील रामबण येथे नियुक्ती आहे. जून महिन्यात त्यांच्याशी एका अनोळखीने संपर्क साधून सात लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज हवे आहे का, असे विचारले. त्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर मात्र १ जुलै रोजी त्यांना त्यांच्या चाळीसगाव येथील स्टेट बँकेत असलेल्या खात्यातून १३ हजार १३६ रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला.
खात्यावर 7 लाख 43 हजारांची कर्जाची रक्कम झाली जमा
खात्यातून रक्कम वजा झाल्याने राजपूत हे सुटी घेऊन चाळीसगाव येथे आले. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चौकशी केली असता त्यांच्या नावावर सात लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले, त्याच्या हप्त्याची रक्कम म्हणून १३ हजार १३६ रुपये डेबिट झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. आपण कोणत्याही कर्जाची मागणी केली नसल्याचे त्यांनी बँकेत सांगितले असता त्यांना त्यांच्या खात्याचा तपशील दाखविण्यात आला. त्या वेळी त्यांना समजले की, १३ जून रोजी त्यांच्या खात्यावर सात लाख ४३ हजार रुपये कर्जाची रक्कम जमा झाली आहे.
सायबर गुन्हेगाराने परस्पर काढले पैसे
हे कर्ज मंजूर झाल्यानंतर सायबर गुन्हेगाराने राजपूत यांच्या खात्यातून १३ जून ते २८ जून या काळात एकूण आठ लाख पाच हजार रुपये परस्पर काढून घेतले. विशेष म्हणजे ही रक्कम काढल्याचा अथवा त्या पूर्वी जमा झालेल्या रकमेचा राजपूत यांच्या मोबाईलवर मेसेजही आलेला नव्हता.
सायबर पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.