मुंबई (वृत्तसंस्था) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर भाजपाकडून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अर्णब गोस्वामी आणि भाजपाचा काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.
ईडीच्या माध्यमातून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाड टाकल्याचा आरोप केला जात आहे. “जेवढ्या ईडीच्या कारवाया आमच्यावर झाल्या आहेत तेवढ्या कोणावर झालेल्या नाहीत. हात बरटलेले नसतील तर घाबरायचं कारण नाही. काहीच नसेल तर ईडी आणि सीडीला घाबरता का? मन साफ असंल तर काहीही होऊ द्या. हे नैराश्यातून केलेले आरोप आहेत,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. “अर्णब गोस्वामी यांच्यासारखे अनेक चॅनेल आहेत. ते काही आमच्याबद्दल बोलत नाहीत का? माझ्यावर, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत नाही का? पण एखादं चॅनेल तुमच्यावर टीका करतं म्हणून ते आमचं होतं का? आमचा अर्णब गोस्वामींशी काही संबध नाही. यांनी केलेली कारस्थानं आपोआप उघड होऊ लागली आहेत,” असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.