जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ९ वर्षे पूर्ण झाली. मात्र हत्यामागील सूत्रधार अद्यापही तपास यंत्रणेच्या हाती लागले नाहीत. त्याचा निषेध म्हणून आणि सूत्रधारांना लवकर अटक करावी या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र अंनिस शाखा जळगाव शहरतर्फे मुख्यमंत्र्यांच्या नावाचे पत्र अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना शनिवारी २० ऑगस्ट रोजी देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक कार्यकर्ते व समाज सुधारक यांचे होणारे खून थांबवण्यासाठी ठोस कायद्याची गरज आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या चारही खुनाच्या प्रकरणात तपास यंत्रणेतील अक्षम्य दिरंगाई बद्दल राज्य व केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. खुनात सहभागी असलेल्या सर्व संघटना आणि सुत्रधारांना तातडीने अटक करावी.
तसेच त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी. धार्मिक मुलतत्ववादी लोक आणि त्यांच्या संघटनांवर बंदी घालावी. सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या लोकांच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी एक स्वतंत्र कडक कायदा करावा.याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री व पंतप्रधान यांनी भेटीची तारीख द्यावी अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आले आहेत.
तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईमेल द्वारे देखील शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन पाठवले आहेत. शनिवारी सकाळी महात्मा गांधी उद्यान येथे शाखेच्या कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक करून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करत डॉ. दाभोलकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राहू असा निर्धार व्यक्त केला.