चांदवड (वृत्तसंस्था) जमिनीवर तक्रारदाराच्या नातलगाच्या नावाची सातबाऱ्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल व रेकॉर्डवर नावे लावण्याच्या मोबदल्यात दहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना कुंदलगावच्या तलाठ्यास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. विजय राजेंद्र जाधव (वय न ३३), असे संशयिताचे नाव आहे.
चांदवड तालुक्यातील शिंगवे , सज्जाचे तलाठी संशयित विजय . राजेंद्र जाधव (रा. श्रम साफल्य 1 कॉलनी, वडेल रोड, देवपूर जि. न धुळे) यांच्याकडे कुंदलगाव येथील अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदार यांच्या आई, मामा, मामांच्या मुली व मावशी यांनी कुंदलगाव ता. चांदवड येथील शेती वाटपासाठी निफाड दिवाणी न्यायालयात दावा दाखल केलेला होता.
कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगाव ता. चांदवड येथील गट नं. ४१०, ४१२ व ४१४ या गटांतील ५०-५० गुंठे जमिनीवर तक्रारदाराच्या आई, मामा व इतर नातेवाईक यांच्या नावांची सातबाऱ्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी त्यांनी चांदवड तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला. तो अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मंडल अधिकाऱ्यांमार्फत तलाठी विजय जाधव याच्याकडे देण्यात आला. या कामाच्या मोबदल्यात तलाठी विजय जाधव याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. सोमवारी (दि. १८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जाधव यास अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव, पोलीस हवालदार प्रणय इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगुर्डे, पोलीस हवालदार विनोद पवार यांच्या पथकाने केली.