जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या आरोग्य समित्तीवर अरविंद देशमुख यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ४१ अअ मधील तरतुदी व त्यानुषंगाने उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका (पीआयएल) क्रमांक ३१३२/ २००४ मध्ये दिलेल्या न्यायनिर्णयानुसार निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरीता योजना तयार केलेली आहे. त्यानुसार प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण कार्यान्वीत खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व १० टक्के खाटा दुर्बल घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रुग्णालयांना बंधनकारक आहे.
धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित खाटा पारदर्शी पध्दतीने निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना उपलब्ध करुन देण्यासाठी विधि व न्याय विभागाच्या संदर्भ क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यस्तरीय विशेष मदत कक्षास सहाय्य करण्यासाठी विधि व न्याय विभागाच्या संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेली जिल्हास्तरीय समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. सदर समितीवर जिल्ह्यातील मा. विधानसभा/विधानपरिषद सदस्य, जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील एक समाजसेवक, जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांची नियुक्ती मंत्री (विधि व न्याय) यांच्या मान्यतेने करण्याची तरतुद करण्यात आली.
विधि व न्याय विभागाच्या संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय समित्तीवर जिल्ह्यातील मा. विधानसभा विधानपरिषद सदस्य यांची सोबत जोडलेल्या विवरणपत्र ‘अ’ मध्ये दर्शविल्याप्रमाणे नियुक्ती करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवक यांची विवरणपत्र ‘ब’ मध्ये दर्शविल्याप्रमाणे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय समितीवर नियुक्ती करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांची संबंधित जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय समित्तीवर विवरणपत्र ‘क’ मध्ये दर्शविल्याप्रमाणे नियुक्ती करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सर्व जिल्हाधिकारी यांनी हे आदेश सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावेत. शासनाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आला.