मुंबई (वृत्तसंस्था) कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला (Aryan Khan) आज क्लिन चीट देण्यात आली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. एनसीबीचे (NCB) तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरच कारवाई होणार असल्याची माहिती आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede ) यांच्यावरच कारवाईचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.
या आरोपपत्रानुसार, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या एसआयटीला क्रूझवर टाकलेल्या छाप्याच्या कारवाईत, अनेक अनियमितता असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर, या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या दिल्ली एसआयटीकडे देण्यात आला होता.
वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह यापूर्वी एसआयटीच्या चौकशी अहवालातही मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सध्या वानखेडे यांना एनसीबीतून हटवण्यात आले असून त्यांची रवानगी त्यांचे मूळ केडर असलेल्या डीआरआयमध्ये करण्यात आलेली आहे. या एसआयटीच्या तपासात अनेकदा समीर वानखेडे यांची साक्षही नोंदवण्यात आलेली आहे. या प्रकरणात एसआयटीने या प्रकरणातील आरोपी, साक्षीदार आणि प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीही नोंदवलेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण गाजत होतं. देशभर या प्रकरणाची चर्चा होती. बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता शाहरुख खान याचाच मुलगा अशा प्रकरणात अडकल्याने देशभर या प्रकरणाने खळबळ माजवली होती.