मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन खानच्या जामिनानंतर वकील सतीश मानेशिंदे यांनी मोठं वक्तव्य केलंय. आर्यन खान हे भाग्यवान आहे की त्याच्या वडिलांना त्याच्यासाठी एक कायदेशीर टीम मिळू शकली जी त्याला देशातील सर्वोत्तम वाटली. या देशात हजारो लोक आहेत ज्यांना वकील परवडत नाही, जे अशिक्षित, गरीब आणि उपेक्षित असल्याचे मानेशिंदे यांनी एका मुलाखतीत सांगितले.
बार अँड बेंचच्या मुलाखतीमध्ये मानेशिंदे यांनी खान यांना उच्च न्यायालयानेच कसा दिलासा दिला, हे उघड केले. ज्यांना वकील नेमणं परवडत नाही, असे अनेक लोक कसे तुरुंगात खितपत पडले आहेत, याविषयीही मानेशिंदे यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना मानेशिंदे म्हणाले, “मला असे वाटते की दोन कनिष्ठ न्यायालये त्यांच्या अधिकारक्षेत्राचा वापर करण्यात अयशस्वी ठरल्या आहेत. कनिष्ठ न्यायालयांच्या अशा अनास्थेमुळे कायदेशीर व्यवस्थेवर भार पडला आहे आणि उच्च न्यायालयांमध्ये खटले प्रलंबित आहेत. ज्या गोष्टीचे कनिष्ठ न्यायालयाने पहिल्याच दिवशी कौतुक करायला हवे होते पण झाले नाही, त्यामुळे हा त्रिस्तरीय लढा सुरू झाला”.
मानेशिंदे पुढे म्हणाले, “आर्यन खान हे भाग्यवान आहे की त्याच्या वडिलांना त्याच्यासाठी एक कायदेशीर टीम मिळू शकली जी त्याला देशातील सर्वोत्तम वाटली. या देशात हजारो लोक आहेत ज्यांना वकील परवडत नाही, जे अशिक्षित, गरीब आणि उपेक्षित आहेत. आपल्या देशाने आणि न्यायव्यवस्थेने अशा लोकांचा विचार करून हे सुधारले पाहिजे. एखाद्या स्टारच्या मुलाने २५ दिवस त्याच्या विरुद्ध काहीही (कोणतेही पुरावे) नसताना त्रास सहन केला, तुरुंगात काढले तर एखाद्या गरीब माणसाचे काय होईल याची आपण कल्पना करू शकतो”.