मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर आता यांची सुरक्षा ‘महाराष्ट्र रक्षक’ करणार आहेत. मनसेचे सरचीटणीस नयन कदम यांनी खास राज ठाकरेंच्या रक्षणासाठी ही टीम तयार केली आहे. मनसेचे सरचीटणीस नयन कदम यांनी ही टीम तयार केली आहे.
आम्हाला सरकारच्या सुरक्षेची गरज नसून राज ठाकरे यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे मनसेच्या नेत्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मनसेचे सरचीटणीस नयन कदम यांनी राज यांच्या संरक्षणासाठी खास ‘महाराष्ट्र रक्षक’ नावाची टीम तयार केली आहे. मनसेने तयार केलेली ही महाराष्ट्र रक्षक टीम राज यांचे संरक्षण करणार आहे. यापुढे ही टीम काळे टी-शर्ट्स घालून राज यांच्या आजूबाजूला दिसेल. राज ठाकरे ज्या-ज्या ठिकाणी जातील त्या सर्व ठिकाणी मनसेची ही महाराष्ट्र रक्षक टीम उपस्थित असेल. आगामी महानगरपालिका आणि सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वाची बैठक आहे. राज ठाकरे हे या बैठकीला उपस्थित असतील. यावेळीसुद्धा राज यांच्या संरक्षणासाठी हे महाराष्ट्र रक्षक तैनात असतील. ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात केलेली आहे. त्याच्या सुरक्षा ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ कार काढून घेतली आहे. तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप आमदार प्रसाद लाड तसेच भाजप नेते आशिष शेलार यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.
राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय अलीकडेच महाविकास आघाडी सरकारने घेतला होता, यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंना मिळणारी झेड दर्जाची सुरक्षा काढून या नेत्यांना आता वायप्लस एक्स्कॉर्ट दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेणाऱ्या बैठकीत अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावरून विरोधी पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकेचं लक्ष्य केले होते. यातच राज ठाकरेंची सुरक्षा कमी केल्यावरून मनसे नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज ठाकरेंना दहशतवाद्यांचा धोका पाहता त्यांची सुरक्षा वाढवण्याऐवजी कमी करणं हे खुजेपणाचं लक्षण आहे अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारवर केली होती, तर मनसेचे कार्यकर्तेच राज ठाकरेंचे खरं संरक्षण आहेत असं रुपाली पाटील यांनी सांगितले होते.