पुणे (वृत्तसंस्था) देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर पुण्यात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर उभारलं होतं. हे मोदी मंदिर आता हटविण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर नरेंद्र मोदी मंदिर हटविण्यात आले आहे.
पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं होतं. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत होते. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आला होता. राम मंदिर उभारणीची प्रेरणा घेत मोदी मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा दावा मोदी समर्थकांकडून करण्यात आला होता. मात्र या मंदिराच्या उभारणीशी शहर भाजपाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केलं होतं.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात मोदी मंदिराची उभारणी केली होती. या मंदिरात मोदी यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला होता. त्यासाठी मुंडे यांनी १ लाख ६० हजार रुपयांचा खर्च केला होता. पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक दिवांशू तिवारी यांच्या मार्फत जयपूर येथून मोदी यांचा अर्धपुतळा तयार करून आणण्यात आला होता. मयूर मुंडे यांनी मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता दर्शनी भागात लावली होती. तसंच शेजारील फलकावर मोदी यांच्या कार्याची माहिती देण्यात आली होती. .