जळगाव (प्रतिनिधी) जळगावमधील सरकारी आशादीप महिला वसतीगृहात काहीही आक्षेपार्ह घडलेले नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ झालेले आहे. विशेष अधिकाऱ्यांनी केलेली सविस्तर चौकशी आणि तहसीलदारांनी केलेली प्राथमिक चौकशी याचे अहवाल विधी मंडळात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडले. मानसिक संतुलन ढळलेल्या एका तरुणीने भावनावेगात केलेले असंबद्ध बडबडीचे आरोप खोटेपणाचे आहेत हे वसतीगृहातील १७ तरुणींनी दिलेल्या माहितीतून सिद्ध झाले आहे. यापुढे जळगावमधील आशादीपची बातमी लिहितांना किंवा चित्रफितीत प्रसारण करताना जो कोणी पत्रकार वा पुढारी खोट्या घटनेचा उल्लेख करेल, त्याला त्या १७ तरुणींच्या घोळक्यात आपापल्या आया, बहिणी, पत्नी यांची तोंडे दिवसा व रात्री स्वप्नातही दिसतील. याचा सरळ अर्थ यापुढे खोटारड्या विषयावरून जळगावची बातमी सुरू होऊ नये, असे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी सोशल मिडियातून खडे बोल सुनावले आहेत.
आशादीप मधील आरोपाचे प्रकरण खोटे आहे, हे मला व्यक्तिशः पहिल्या बातमी पासून लक्षात आले होते. कारण महिला वसतीगृहात सर्व कारभार हा महिला अधीक्षिकेच्या अखत्यारित असतो. तेथे परवानगी शिवाय कोणालाही आत प्रवेश नसतो. पोलिसांचा संबंध आलाच तर तो कोर्टाचा आदेश वा गुन्हे प्रकारातील तरुणीला आणून सोडणे एवढाच असतो. महिला वसतीगृहात दाखल तरुणींशी कोणतेही अश्लाघ्य कृत्य कोणीही करेल अशी मोगलाई सध्या तरी नाही. ही कार्यपद्धती माहित नसलेल्या खुळ्या, परजीवी पत्रकारांनी आशादीप संदर्भातील खोट्या बातम्या पसरवल्या. सध्याचे पत्रकार परजीवी आहेत, कारण कोणाला बातमी घडण्याच्या अगोदर पत्रक हवे, कोणाला रेडी कॉपी पेस्ट बातमी हवी, कोणाला फोटो, व्हिडिओ क्लिप हवी. अशाच परजीवी व बेसावध पत्रकारांनी आशादीपमधील तरुणीचा आरडाओरडचा व्हिडिओ बातमीच्या आशयाचा स्त्रोत मानून जळगाव शहराची बदनामी ठोकून टाकली.
जे घडलेच नाही, ते घडले आहे असे लिहिणारा, बोलणारा एकही पत्रकार वसतीगृहाच्या आधीक्षिकेशी आणि आरोप करणाऱ्या त्या तरुणीशी बोलला नाही. तसे बोलणे शक्यच नव्हते कारण आशादीपमध्ये प्रवेशाचे नियम आहेत. ते पाळावे लागतात. अशावेळी एक तरुणी असंबद्ध ओरडते आणि त्याची बातमी करण्यापूर्वी ती कोण आहे ? याची चौकशी न करता बातमी प्रसारणाचा ढोल बडवला जातो हेच परजीवी आणि निष्काळजी पत्रकारितेचे उदाहरण आहे. एका उताविळ व्यक्तिने ओरडण्याचा व्हिडिओ शूट केला आणि त्यावर आधारित खोटी बातमी उभी केली गेली. खरे तर अशा प्रकारे पत्रकारिता केल्याचा पश्चाताप संबंधितांनी करायला हवा.
आशादीपमधील इनसायडर स्टोरी येथून सुरू होते. ओरडून खोटी बातमी रंगवणारी ती तरुणी पारोळा येथील आहे. तिचे मानसिक संतुलन बिघडते. तिच्या पालकांनीच तशी तक्रार पोलिसात दिली आहे. हा तपशिल आता समोर आलेला आहे. पण या शिवाय अजून वेगळी माहिती समोर येते. ती माहिती त्या तरुणीचा मानसिक तोल कोणत्या स्तरापर्यंत बिघडतो हे दर्शवते. मी अगोदरपासून त्या तरुणीचे नाव कधीही लिहिलेले नाही. मला तिच्या बदनामीत नव्हे तर मानसिक आजाराच्या पातळी घसरण्यात असलेला धोका यात इंटरेस्ट आहे. या तरुणीमुळे कुटुंबाला तीन वेळा घर बदलावे लागले. कशासाठी तर ती शेजाऱ्यांशी अकारण भांडते. ती चाकू घेऊन फिरते. ती दगड मारते. ती रात्री घरातून निघून रस्त्याने दूरवर जाऊन बसते. हा तपशिल असलेली लेखी तक्रार हाती आहे. पण या शिवाय आणखी दोन तथ्ये समोर आली आहे. त्यात पहिले, या तरुणीने जन्मदात्या आईला अनेकवेळा मारले आहे. दुसरे, या तरुणीने सख्ख्या भावावर दुषित नजरेचा आरोपही लावला आहे. या सर्व कृती तरुणीचा मानसिक स्तर किती बिघडू शकतो हे दर्शवतात. अशावेळी बातमीच्या आशयाचा खरेपणा तपासण्यासाठी काही वेळ दिला पाहिजे हा निर्णय पत्रकार व संपादकाने घ्यायलाच हवा होता. पारोळ्याच्या त्या तरुणीला मानसिक विकार तज्ञाकडे उपचारासाठी पाठवले जाणार आहे. बहुधा काल ती कार्यवाही झाली आसावी.
इनसायडर स्टोरीत अजून एक उपकथानक आहे. एका महिला नेत्यांची एक आदिवासी कार्यकर्ती सुद्धा याच वसतीगृहात दाखल आहे. तिचे नाव माहिती आहे. पण लिहायचे टाळले आहे. या तरुणीला सुद्धा मानसिक संतुलन बिघडण्याचा आजार आहे. तीने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. व याच तरुणीला पारोळ्याच्या त्या वादग्रस्त तरुणीने पाठीवर बेदम मारल्याचे वळ होते. तशी पाठ आदिवासी तरुणीने एका महिला लोकप्रतिनिधीला दाखवली. खरे तर हे सत्य बाहेर यायला हवे. ते आलेले नाही.
इनसायडर स्टोरी अजून पुढे सरकते. गृहमंत्री अनिल देशमुख सभागृहात म्हणाले, ‘आशादीपमधील तरुणींनी त्यांचा अंतर्गत करमणुकीचा कार्यक्रम केला. तेव्हा त्यांनी नृत्य केले. पण ते अश्लाघ्य नव्हते आणि त्यांना तसे करायला कोणीही भाग पाडले नाही. किंवा तेथे बाहेरची कोणीही मंडळी नव्हती.’ देशमुख यांच्या या वक्तव्याशी या आदिवासी तरुणीचा संबंध आहे. वसतीगृहातील तरुणींनी एकत्र येऊन स्वतःसाठी गाणी म्हटली आणि नृत्यही केले. याचवेळी या आदिवासी तरुणीने वरच्या बाजूस घातलेले श्रग (ब्लेझर सारखे) काढून फेकले. नृत्याचा एक भाग म्हणून. अर्थात श्रगाखाली कपडे होते. तिथे तेव्हा वसतीगृहातील तरुणीच होत्या. हे कृत्य मी स्वतः केले असे त्या आदिवासी तरुणीने एका महिला लोकप्रतिनिधीकडे कबूल केले आहे. ही आदिवासी तरुणी सध्या पालकांच्या ताब्यात असून तेथे जावून महिला लोकप्रतिनिधींनी तिची भेट घेतली. आदिवासी तरुणीच्या त्या कृत्याचा ‘ध चा मा’ पारोळ्याच्या त्या तरुणीने केला.
आशादीप वसतीगृह हे सरकारी आहे. तेथे जेवण, वस्तू पुरवठ्याचे ठेके असतात. ठेक्याचे जेवण कितीही चांगले असले तरी खाणाऱ्याच्या चवीनुसार काही तक्रारी असतातच. भाजीची चव खराब, पोळ्या कच्च्या वा जास्त भाजलेल्या. डाळ पातळ वा भाजी नावडीची असे तक्रारींचे स्वरूप असते. याशिवाय केसांना लावायचे तेल, साबण, सैनिटरी पैड वगैरे पुरवठ्याविषयी तक्रारी असतात. मानसिक संतुलन अस्थिर आसलेली व्यक्ती अशा तक्रारी जरा जास्तच आक्रमकपणे मांडते. पारोळ्याची ती तरुणी वारंवार अशा तक्रारी करीत असते. याच तक्रारीनुसार ती वसतीगृह अधीक्षिकेला धमकावत होती, ‘मला पोलिसात तक्रार करायची आहे.’ त्यांच्यासमोर प्रश्न होता हिची मागणी कशी पूर्ण करावी ? जे जेवण, जी व्यवस्था इतर १७ तरुणी स्विकारतात त्या विषयी ही एकटीच वारंवार तक्रारी करते, इतरांना मारते व धमकावते सुद्धा. पारोळ्याच्या त्या तरुणीने इतर तीन गरोदर तरुणींना मारहाण केल्याचे चौकशीतही निष्पन्न झाले आहे.
इनसायड स्टोरीचा शेवटचा भाग हा गणेश कॉलनीतील आशादीप शेजारच्या नागरी वस्तीचा आहे. महिलांच्या वसतीगृहात दाखल तरुणी आपापसात भांडतात. मोठ्याने ओरडतात. पारोळ्याती तरुणी इतरांना मारहाण करते. आरडाओरड होतो. याचा त्रास इतर नागरिकांना होतो. यापेक्षा वेगळी नागरिकांची तक्रार आहे. वसतीगृहातील तरुणींना भेटायला त्यांचे नातेवाईक वा संबांधित येतात. वसतीगृहात प्रवेश नसतो. मग वरच्या खिडकीतून तरुणी ओरडते आणि खालून भेटणारे ओरडतात. याचा त्रास शेजारील रहिवाशांना होतो. शिवाय वसतीगृहाच्या कंपाऊंडजवळ विनाकारण भेटणारे गोळा होतात. अशाच भेटीसाठी आलेल्या एकाने पारोळ्याच्या तरुणीचा ओरडण्याचा व्हिडिओ मोबाईलवर शूट केला आणि व्हायरल केला. जळगावच्या बदनामीचे कारण ठरलेल्या त्या व्हिडिओचे मूळ या इनसायडर स्टोरीत आहे.
मित्राहो, आशादीप संदर्भात गेल्या दोन दिवसात मीअनेकांशी बोलून, सर्वच बाजू तपासून, अधिकारी वर्गाची संमती घेऊन सोशल मीडियात वृत्तांकन केले. पत्रकछाप, परजीवी पत्रकाराने त्यावर लंगडा युक्तिवाद करायचा प्रयत्न केला. मी अशा अर्धवटरावांना भीक घालत नाही. मला जे सुनवायचे ते मी थेट संपादकाला सुनावतो. कारण, सन १९९२ मध्ये जळगाव शहरात वासनाकांड नावाने असेच कुभांड रचले गेले होते. तेव्हा पोलीस म्हणाले होते, ‘यात ५०० महिलाही असू शकतात’ मी ‘सकाळ’ चा कार्यालयीन बातमीदार तेव्हा होतो. आमचा विवेक ठिकाणावर ठेऊन आम्ही ५०० चा आकडा छापला नव्हता. पण ज्यांनी ५०० चा आकडा छापला ती प्रवृत्ती आजही आहेच. ते आजही संख्यात्मक आणि कृत्यात्मक विषयात बातमी शोधतात. आपण जळगावात राहतो, आपल्या घरातील महिलाही जळगावचाच भाग आहेत याचे भान ‘बातमीचा धंदा’ करताना सुटते. त्यातून उभे राहते, ‘बदनामीचे आशादीप प्रकरण’. असा संताप दिलीप तिवारी यांनी व्यक्त केला.
जळगावच्या बदनामीचे असेही टप्पे – सन १९९४ ‘जळगाव कैसेट’ म्हणून विधान सभेत सादर केलेल्या ‘काला कौआ’ या व्हिडिओ कैसेटचे सत्य कधीही समोर आले नाही. सन २०१९ पासून जामनेर सीडीचा बोलबाला आहे. ती सीडी कधीही समोर आली नाही. सन २०१९ मध्ये खासदारकीची उमेदवारी कापायला सोयीने काही फोटो व क्लिप बाहेर आल्या. तेव्हा तो संमतीचा मामला होता. आता तर धनंजय मुंडे यांच्या दोन लग्नांचे आणि संजय राठोड यांच्या संबंधांचे समर्थनही समाज करतो आहे.
आशादीपमध्ये काहीही घडलेले नाही. पण इतर ठिकाणची व्हिडिओ क्लिप जळगावची म्हणून फिरते आहे. (अशा क्लिप इंटरनेटवर उपलब्ध आहेत) राजकीय महिलेचा कुंटनखाना आणि महिलेचा हनीट्रैप असे विषय सुद्धा मध्यंतरी येऊन गेले. असे दिलीप तिवारी यांनी सोशल मीडियामधून सागितले.