नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आसाम-मिझोरम सीमेवरील हिंसाचारात आसाम पोलिसांच्या ६ जवानांचा मृत्यू झाला आहे. यात आसामच्या पोलीस दलात कछर जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असणारे मराठमोळे अधिकारी वैभव निंबाळकर हे जखमी झाले आहेत. मिझोरममधील गटाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर यांच्या पायात गोळी लागली आहे.
आसामच्या बराक खोऱ्यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामच्या ऐझॉल, कोलासिब आणि मामित या तीन जिल्ह्य़ांना लागून १६४ किलोमीटरची सीमा आहे. त्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. याच वादातून सोमवारी पुन्हा एकदा सीमेवर संघर्षाचा उद्रेक झाला. दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचाराला तोंड फुटले.
हा भाग वादग्रस्त असल्याचे दोन्ही राज्यांच्या पोलीस दलांनी यापूर्वी मान्य केले आहे. त्यांच्यातील या कराराचे उल्लंघन आसाम पोलिसांनी केल्याने हिंसाचार उसळल्याचे सांगण्यात येते. दोन्ही पोलीस दलांतील ही धुमश्चक्री सुमारे सहा तासांहून अधिक काळ सुरू होती. यात पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच गोळीबारही करण्यात आला. या गोळीबारात आसाम पोलीस दलातील सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ५० पोलीस जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आसाममधील कछर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक वैभव निंबाळकर यांचाही समावेश आहे. निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. निंबाळकर हे मूळच महाराष्ट्रातील बारामतीचे रहिवाशी आहेत. ते आसाम केडरचे अधिकारी आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
आसाममधखील बराक घाटी परिसरातील कछार, करीमगंज आणि हाईलकांडीची १६४ किमीची सीमा मिझोरम राज्यातील आईजोल, कोलासीब आणि मामित जिल्ह्यांना लागते. जमीनीच्या कारणावरुन ऑगस्ट २०२० पासून आतंरराज्य सीमेवर संघर्ष सुरु झाला आहे. मिझोरमचे पोलीस महानिदेशक लालबियाकथांगा खिंगागते यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीमध्ये वादग्रस्त भागात एटलांन नदीच्या जवळील भागात रात्री आठ झोपड्या जाळण्यात आल्याचं सांगितलं. हिमंता बिस्वा सरमा आसामचे मुख्यमंत्री झाल्यानंतर संघर्ष वाढला आहे. गेल्यावर्षी झालेल्या संघर्षानंतर केंद्र सरकारनं हस्तक्षेप केला होता.