चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जामदा येथील अतिक्रमणाच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ, धमकी व प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जमावाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, समोरच्या मंडळीनेही विनयभंग, धमकी आणि मारहाण केल्याबद्दल मेहुणबारे पोलीस स्थानकात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक असे की, जामदा येथील आबा बापू महाले (वय २६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ग्रामपंचायतीने त्यांच्या समाजाला ओटा बांधण्यासाठी जागा दिलेली होती. मात्र याच ठिकाणी गावातील काही जणांनी अतिक्रमण करून टपर्या टाकल्या होत्या. ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्यानंतर दोघांनी टपर्या काढून घेतल्या होत्या. तर, चौघांनी काढल्या नव्हत्या. यातच ग्रामपंचायतीने रस्ता तयार केल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण करून टपर्या ठेवण्याची तयारी करण्यात आली होती. याच्या विरोधात ग्रामपंचायतीत तक्रार अर्ज देऊन असे न करण्याचे सूचित करण्यात आले होते. दरम्यान, १८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आबा महाले हे समाजबांधवांसोबत बसलेले असतांना रवींद्र भगवान काकडे, धनराज नाना काकडे यांच्यासह सुमारे २४-२५ जणांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून धमकावले. यानंतर २० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी दहाच्या सुमारास सुमारे ७०-८० जणांच्या जमावाने पुन्हा त्यांना अतिक्रमणाबाबत धमकावत शिवीगाळ केली. यानंतर काल दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता जमाव चाल करून आला. यातील दीपक भगवान काकडे याने सिध्दार्थ भानुदास जाधव यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात त्यांच्या मानेला जखम झाली. याप्रसंगी जमावाने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या अनुषंगाने मेहुणबारे पोलीस स्थानकात रवींद्र भगवान काकडे, धनराज नाना काकडे यांच्यासह इतर सुमारे १०० स्त्री-पुरूषांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, याच प्रकरणात क्रॉस तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. याची फिर्याद एका महिलेने दिलेली आहे. यानुसार कोळगाव ते मेहुणबारे रस्त्याचे काम सुरू असल्याने आपल्या चुलत भावाने त्याची टपरी उचलून ठेवली होती. रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्या भागातील लोकांनी टपरी ठेवण्यासाठी विरोध सुरू केला. यानंतर काल दि. २१ सप्टेंबर २०२१ रोजी ही महिला गावात जंताच्या गोळ्यांचे वाटप करण्यासाठी गेली असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली. ज्ञानेश्वर शिवाजी अहिरे आणि काही महिलांनी त्यांना धमकावत शिवीगाळ केली. याप्रसंगी आपल्याला मारहाण केल्याने १० ग्रॅमची सोन्याची पोत तुटून पडली. तसेच ज्ञानेश्वर शिवाजी अहिरे, अशोक कैलास सोनवणे आणि इतरांनी आपला विनयभंग केला. तसेच आपल्या पतीला मारहाण केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या अनुषंगाने संबंधीतांच्या विरूध्द मेहुणबारे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.