पारोळा (प्रतिनिधी) शेती नफ्याने दुसऱ्याला देण्याबाबत आल्याच्या रागातून एकाला जीवे मारण्याची धमकी देत प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शितल अनिल पाटील (वय ३८, रा. प्लॉट नं. २९ विद्युत कॉलनी गट नं. ६५/६६ सरकारी अभियांत्रिकी विद्यालयासमोर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ५ जून २०२२ रोजी शितल यांचे सासरे व चुलत सासरे यांच्या नावे असलेली शेत जमीन गट क्रमांक २५१/१ चा हिस्सा मागण्याकरिता शितलचे पती हे त्यांच्या मोटरसायकलने चोरवळ गावी गेले होते. शीतल यांचे पतीने शेती नफ्याने दुसऱ्यास देण्याबाबत अनिल पंडित पाटील, सुनील पुंडलिक पाटील, लोटन शामराव पाटील, देविदास हिंमत पाटील, प्रभाकर हिंमत पाटील, महेंद्र लोटन पाटील (सर्व रा. चोरवड ता.पारोळा) यांना बोलले असता त्याचा राग येऊन अनिल पाटील याने गैरकायद्याची मंडळी जमवून लाकडी दांडक्याने डोक्यावर व पायावर मारहाण करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहेत.